नवी दिल्ली: गेल्या काही दिवसापासून काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची चर्चा सुरू आहे. या निवडणुकीत खासदार शशी थरुर आणि काँग्रेसचे ज्येष्ठनेते मल्लिकार्जुन खरगे एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. आज काँग्रेस अध्यक्षपदाचे नाव जाहीर करण्यात येणार आहे. याअगोदरच काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. खासदार शशी थरूर यांचे पोलिंग एजंट सलमान सोज यांनी निवडणुकीत हेराफेरी झाल्याची तक्रार केली आहे.
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. त्यासाठीची मतमोजणी सुरू आहे. दरम्यान, काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवत असलेले शशी थरूर यांचे पोलिंग एजंट सलमान सोज यांनी निवडणुकीत हेराफेरी झाल्याची तक्रार केली आहे. त्यांनी याप्रकरणी काँग्रेस निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांना पत्र लिहून निवडणुकीत हेराफेरी झाल्याची तक्रार केली आहे.
"...मग काय घालायचं? बिकनी?; एक दिवस हिजाब परिधान करणारी महिला PM व्हावी, हे माझं स्वप्न"
उत्तर प्रदेशमध्ये मतदानादरम्यान अनियमितता केल्याचा आरोप सलमान सोज यांनी केला आहे. "उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक प्राधिकरणाच्या नियमांची पायमल्ली करण्यात आली आहे. पोलिंग एजंटशिवाय पेट्या सील करण्यात आल्या. इतर काही राज्यांमध्येही नियमांचे उल्लंघन झाल्याचेही सलमान सोज यांनी पत्रात म्हटले आहे. 'नियमांनुसार पोलिंग एजंटला समरी सीट मिळायला हवी ज्यावर प्राधिकरणाचा प्रभाव नाही, असंही पुढं सोज म्हणाले.
२४ वर्षांनंतर गांधी घराण्याबाहेरील एखाद्या नेत्याची काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी निवड होणार आहे.पक्षाचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर यांच्यात लढत झाली. आज बुधवारी सकाळी १०.२० वाजता पक्षाच्या मुख्यालयात मतमोजणी सुरू झाली. यावेळी खासदार कार्ती चिदंबरम, अध्यक्षपदाचे उमेदवार शशी थरूर यांच्यासह निवडणूक प्रतिनिधी उपस्थित होते. दुसरे उमेदवार मल्लिकार्जुन खरगे यांच्यासाठी खासदार सय्यद नासिर हुसेन आणि अन्य काही नेते उपस्थित आहेत.