नवी दिल्ली : राज्यसभेत अतिशय मुद्देसुद व आक्रमकपणे विरोधकांची बाजू मांडणारे अभ्यासू खासदार सीताराम येचुरी यांना तिसºयांदा उमेदवारी न देण्याचा निर्णय त्यांच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने घेतला आहे. माकपच्या मध्यवर्ती समितीने हा निर्णय जाहीर केला. येचुरी यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवावे की नाही, यावरून पक्षात दोन गट होते. त्याचे प्रतिबिंब समितीच्या बैठकीतही उमटले. त्यामुळे मतदान घेऊन त्यांना येचुरींचा राज्यसभा प्रवेश रोखण्यात आला.माकप कोणत्याही नेत्याला दोनपेक्षा अधिक वेळा राज्यसभेची उमेदवारी देत नाही. पक्षाचे सरचिटणीस असलेल्या येचुरी यांना काँग्रेसच्या मदतीने राज्यसभेवर पाठविणे पक्षाच्या केरळमधील नेत्यांना मान्यही नव्हते. समितीमधील आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू या दक्षिणेच्या राज्यांमधील सदस्यांनीही प्रस्तावाला विरोध केला. काँग्रेसने येचुरी यांना पश्चिम बंगालमधून राज्यसभेवर निवडून पाठवण्यासाठी मदत करण्याचा प्रस्ताव माकपपुढे ठेवला होता.विरोधकांची बाजू कमकुवतमाकपच्या निर्णयामुळे सत्ताधारी पक्षाला अडचणीत आणण्यात पुढे असणारे येचुरी यापुढे राज्यसभेत दिसणार नाहीत. त्यामुळे विरोधकांची बाजू काहीशी कमकुवतच होणार आहे. अतिशय आक्रमक, पण अभ्यासू व मुद्देसुद भाषण करणाºया मोजक्या सदस्यांत सीताराम येचुरी यांचा समावेश होता. डी. राजा, नरेश अग्रवाल, आनंद शर्मा, सतीश मिश्रा, मायावती आणि शरद यादव हे सदस्य सातत्याने विरोधकांची बाजू जोमाने मांडत. त्यातील मायावती यांनी गेल्या आठवड्यात राजीनामा दिला आणि यापुढे येचुरी हेही राज्यसभेत नसतील.
येचुरींना तिसरी टर्म नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 3:26 AM