ऑनलाइन लोकमत
भोपाळ, दि. 24 - उत्तर प्रदेशमधील समाजवादी पार्टीचे खासदार मुनव्वर सलीम चौधरी यांच्या मध्य प्रदेशात असलेल्या विदिशा येथील फॉर्म हाऊसमधून 23 शेळ्या चोरीला गेल्याची घटना गेल्या रविवारी घडली. दरम्यान, पोलिसांनी चोरीला गेलेल्या 23 शेळ्यांपैकी 17 शेळ्या 24 तासांत शोधून काढल्या आहेत. तर, यातील तीन शेळ्यांचा मृत्यू झाला असून आणखी तीन शेळ्यांचा शोध सुरु आहे.
विदिशा सिव्हिल लाईन स्टेशनचे पोलीस अधिकारी एच. एस. राजावत यांनी दिलेल्या माहितीनुसार, खासदार मुनव्वर सलीम चौधरी यांचा भाऊ मुबश्शिर चौधरी यांनी फॉर्म हाऊसमधून शेळ्या चोरी झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी फॉर्म हाऊसजवळील काही भागात तपास केला असता, येथील मुरवाडा गावाजवळ 17 शेळ्या सापडल्या. याच परिसरात तीन शेळ्यांचा मृत्यू झाला. तर, तीन शेळ्या अद्याप गायब असून त्यांचा शोध सुरु असल्याचे राजावत यांनी सांगितले. मुरवाडा गाव फॉर्म हाऊसपासून आठ किलोमीटरच्या अंतरावर असून ज्या अज्ञात चोरट्यांनी शेळ्या चोरल्या होत्या. त्या चोरट्यांनी पडकले जाण्याच्या भीतीपोटी शेळ्या याच परिसरात सोडून पळ काढला. कारण, येथील गावक-यांनी त्यांना शेळ्या घेऊन जाताना पाहिले होते, असेही राजावत यांनी सांगितले.
तक्रारदार मुबश्शिर चौधरी म्हणाले की, विदिशा सिव्हिल लाईन पोलिसांनी लवकर कारवाई करत शेळ्यांचा शोध घेल्याने मी त्यांना धन्यवाद देतो. त्यांनी शेळ्यांचा शोध घेण्यासाठी विदिशा शहरातील सर्व पोलीस स्टेशनला सतर्क केले होते.
दरम्यान, गेल्या तीन वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशचे मंत्री व समाजवादी पार्टी नेते आझम खान यांच्या सुद्धा म्हशी चोरीला गेल्या होत्या. त्यांनी चोरीला गेलेल्या म्हशींच्या शोधासाठी अवघे पोलीस दल कामाला लागले होते. इतकेच नव्हे, तर पोलिसांच्या शर्थीच्या प्रयत्नाने त्यांचा म्हशी त्यांना सुखरूपरित्या मिळाल्या होत्या.