अभिनेत्याला नेता बनवलं की, हेच होणार; काँग्रेसकडून सनीच्या 'त्या' वक्तव्याचा समाचार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 12:58 PM2020-02-18T12:58:33+5:302020-02-18T13:00:23+5:30
सनी देओल सध्या राज्याच्या दौऱ्यावर असून नागरिकांच्या समस्या समजून घेत आहे. आपण केवळ लोकांना भेटायला आलो असून आपलं काम करत असल्याचे सनीने सांगितले.
नवी दिल्ली - गुरुदासपूर मतदार संघाचे भाजप खासदार आणि बॉलिवूड अभिनेता सनी देओल यांनी केलेल्या धुलाई करण्याच्या वक्तव्याने वाद निर्माण झाला आहे. यावरून काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे. अभिनेत्याला नेता बनवलं की असंच होणार अशी टीका काँग्रेसकडून करण्यात आली आहे.
नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात सनी देओलने धुलाई करण्यात आपल्यासारखं कोण नाही, असं म्हटले होते. पठाणकोट येथे आयोजित एका सभेत सनी देओल बोलत होते. राज्य सरकारचे कर्मचारी येथील जनतेला त्रास देत आहेत. तसेच जनतेने चुकीच्या व्यक्तीला निवडून दिल्याचे म्हणतात. मला या वादात पडायचे नाही. परंतु सर्वांना ठावूक आहे की, धुलाई करण्यात माझ्यापेक्षा चांगलं दुसरं कोण नाही, अशा शब्दात सनीने राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना इशारा दिला आहे.
सनीच्या या वक्तव्यावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. भोआ विधानसभा मतदार संघाचे आमदार जोगिंदर पाल यांनी भाजपला टोला लगावला आहे. अभिनेत्याला नेता बनविल्यानंतर असंच होणार, यात सनी देओलची काहीही चूक नसून भाजपची चूक असल्याचे ते म्हणाले. सनी देओल ज्या प्रमाणे चित्रपटात नाचत होते, त्याप्रमाणे आताही नाचत असल्याचे पाल यांनी म्हटले.
सनी देओल सध्या पंजाब राज्याच्या दौऱ्यावर असून नागरिकांच्या समस्या समजून घेत आहे. आपण केवळ लोकांना भेटायला आलो असून आपलं काम करत असल्याचे सनीने सांगितले.