- संजय शर्मालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : उपराष्ट्रपती व राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून खासदारांना निलंबित करण्याचे तपशीलवार कारण सांगितले आहे.
शरद पवार यांनी म्हटले होते की, एखाद्याने दुसऱ्याची मिमिक्री केली तर ती एवढ्या गांभीर्याने घेण्याची गरज नाही. हा एखाद्या जातीचा अपमान कसा असेल? उद्या कोणी माझी मिमिक्री केली तर तो मराठ्यांचा आणि शेतकऱ्यांचा अपमान असल्याचे सांगणार का? तसेही हे सर्व सभागृहाच्या बाहेर झालेले आहे.
शरद पवार यांच्या या विधानानंतर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी त्यांना ज्येष्ठ खासदार संबोधून म्हटले आहे की, लोकसभेतील सुरक्षा भेदण्याची घटना अभूतपूर्व होती. अशी घटना घडता कामा नये. या घटनेनंतर सभापती सर्व राजकीय पक्षांच्या खासदारांशी संसदेच्या सुरक्षेतील त्रुटी दूर करण्यावर चर्चा करीत होते; परंतु १४ व १५ डिसेंबर रोजी काही खासदारांनी राज्यसभेत ज्या प्रकारे वर्तणूक केली, त्यामुळे राज्यसभेसारख्या वरिष्ठ सभागृहाच्या सन्मानाला धक्का पोहोचला आहे. त्यामुळे काही खासदारांना नाइलाजाने निलंबित करावे लागले आहे.
‘संसदेतील गंभीर चर्चेत ‘जात’ आणणे निराशाजनक’
संसदेतील गंभीर चर्चेदरम्यान जातीचा उल्लेख केला जाणे अत्यंत निराशाजनक असल्याचे सांगून ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी २१ व्या शतकात या संकुचित ओळखीच्या पलीकडे जाण्याचे आवाहन लोकांना केले. एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावरील चर्चेदरम्यान जातीचा उल्लेख केला जाणे हे अत्यंत निराशाजनक आहे.
टीका करण्यासाठी जन्मस्थळाचा वापर करणे निराशाजनक आहे. कोणी महात्मा गांधी किंवा सरदार वल्लभभाई पटेल यांची जात किंवा सी. एफ. ॲण्ड्र्यूज किंवा ॲनी बेझंट यांचे जन्मस्थान विचारल्याचे मला आठवत नाही. २१ व्या शतकात आम्ही हा संकुचित दृष्टिकोन त्यागून मानवतेची मूल्ये, नियम आत्मसात करू शकतो का, असेही ते म्हणाले.
‘आमचेही निलंबन करा म्हणून खासदार मागे लागले’सरकार लोकसभेतील सदस्यांना निलंबित करण्यास इच्छुक नव्हती, परंतु काही विरोधी सदस्यांच्या विरोधात निलंबनाच्या कारवाईनंतर त्यांच्या काही सहकाऱ्यांनी स्वतःलाही निलंबित करण्याची विनंती केली होती,” असा दावा संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी शुक्रवारी केला. जोशी यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, संसदेत मंजूर झालेल्या तीन नवीन फौजदारी कायद्यांविरोधात विरोधकांची काही तक्रार असल्यास ते न्यायालयात जाण्यास मोकळे आहेत. “आम्हाला खासदारांना निलंबित करायचे नव्हते, आम्ही त्यांना विनंती केली होती. मात्र आम्ही काही सदस्यांना निलंबित केल्यावर त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी निलंबनाची मागणी सुरू केली. काँग्रेसची पातळी इतकी खालावली आहे,” अशी टीकाही जोशी यांनी केली.
धनखड अस्वस्थसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी केलेल्या आपल्या मिमिक्रीनंतर धनखड अस्वस्थ आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत सर्वांनी फोन करून अपमान सहन करण्याबाबत सांगितले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर म्हटले होते की, मी मागील २० वर्षांपासून अपमान सहन करीत आलो आहे.
पत्रात व्यक्त केले दु:खमान्य न होणाऱ्या मागण्या करत सभागृहाचे कामकाज ठप्प करणे दुर्दैवी व जनहिताच्या विरोधात आहे, असे धनखड यांनी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांना लिहिलेल्या एका पत्रात म्हटले आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान खरगे यांनी त्यांना (धनखड) भेटण्यास नकार देणे हे संसदीय परंपरेला धरून नसल्याचेही या पत्रात म्हटल्याचे सूत्रांनी सांगितले.