"विनेश फोगटला हरवण्यासाठी..."; हरयाणात 'आप'च्या जखमेवर मालीवाल यांनी चोळले मीठ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 12:22 PM2024-10-08T12:22:01+5:302024-10-08T12:24:52+5:30

Swati Maliwal : हरयाणा विधानसभा निवडणुकीत आपला अपयश मिळाल्यानंतर खासदार स्वाती मालीवाल यांनी जोरदार टीका केली आहे.

MP Swati Maliwal has criticized AAP after failure in Haryana assembly elections | "विनेश फोगटला हरवण्यासाठी..."; हरयाणात 'आप'च्या जखमेवर मालीवाल यांनी चोळले मीठ

"विनेश फोगटला हरवण्यासाठी..."; हरयाणात 'आप'च्या जखमेवर मालीवाल यांनी चोळले मीठ

Haryana Assembly Results:हरयाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार लढत पाहायला मिळत आहेत. सुरुवातीच्या निकालाच्या कलापासून काँग्रेसने मोठी आघाडी घेतली होती. त्यानंतर भाजपने आघाडी घेतली. मात्र आता पुन्हा एकदा काँग्रेसने मुसंडी मारली आहे. दुसरीकडे हरयाणा विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. हरयाणामध्ये आपचा सुपडा साफ होत असताना त्यांच्याच पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालवाल यांनी पक्षावर गंभीर आरोप केले आहेत. आप इंडिया आघाडीा विश्वासाचा विश्वासघात करत असल्याचे स्वाती मालीवाल यांनी म्हटलं आहे.

हरयाणात मोठा विजय मिळवण्याच्या उद्देषाने निवडणुकीत उतरलेल्या आम आदमी पक्षाला खातेही उघडता आलेले नाही. आपने हरयाणामध्ये ८९ जागांवर निवडणूक लढवली आहे. मात्र या निवडणुकीत त्यांना दोन टक्क्यांपेक्षा कमी मतं मिळाली. आपच्या या कामगिरीवर पक्षाच्या बंडखोर राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी जखमेवर मीठ चोळण्याची संधी सोडली नाही. अरविंद केजरीवाल यांचे नाव न घेता त्यांची खिल्ली उडवली आहे. स्वाती मालीवाल यांनी आप पक्षाच्या उमेदवारांना डिपॉझिटही वाचवता आलेलं नाही असं म्हटलं आहे. 

आम आदमी पक्षाने काँग्रेसची मते पळवल्याचा आरोप स्वाती मालीवाल यांनी केला आहे. "काँग्रेसचा बदला घेण्यासाठीच ते हरयाणात आले होते. माझ्यावर भाजपचा एजंट असल्याचा खोटा आरोप केला, आज ते स्वत: इंडिया आघाडीशी गद्दारी करत आहे आणि काँग्रेसची मते पळवत आहेत. हे सगळं सोडा, विनेश फोगटलाही हरवण्यासाठी यांनी उमेदवार उभा केला. आपल्याच राज्यात या लोकांना डिपॉझिट वाचवता येत नाही, अशी परिस्थिती का निर्माण झाली आहे? अजूनही वेळ आहे, अहंकार सोडा, डोळ्यांवरील पडदा हटवा, नाटक करू नका आणि जनतेसाठी काम करा," अशी खोचक पोस्ट स्वाती मालीवाल यांनी केली आहे.

जामीनावर बाहेर आल्यानंतर आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल, त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल, दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, राज्यसभा खासदार संजय सिंह यांच्यासह अनेक नेत्यांनी हरयाणात जोरदार प्रचार केला होता. अरविंद केजरीवाल हे मूळचे हरयाणाचे असून ही बाब जनतेसमोर ठेवून त्यांनी मते मागितली होती. आमच्या पाठिंब्याशिवाय हरयाणात सरकार स्थापन होणार नाही, असा दावा केजरीवाल यांनी अनेक वेळा केला. मात्र निवडणुकीचे चित्र स्पष्ट व्हायला लागल्यानंतर आपच्या उमेदवारांना हरयाणाच्या जनतेने साफ नाकारल्याचे दिसत आहे.

दरम्यान, हरयाणा निवडणुकीच्या आत्तापर्यंतच्या कलानुसार भाजपला मोठी आघाडी मिळाली आहे. भाजप४७ जागांवर आघाडीवर आहे तर काँग्रेस ३६ जागांवर आघाडीवर आहे. जर भाजपकडे हीच आघाडी कायम राहिली तर राज्याच्या निवडणूक इतिहासातील ही पक्षाची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी असणार आहे. 

Web Title: MP Swati Maliwal has criticized AAP after failure in Haryana assembly elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.