‘माझ्या रात्री वाया गेल्या आहेत, आधी माझ्यासाठी बायको शोधा’...निवडणूक ड्युटीच्या प्रशिक्षणाला अनुपस्थित राहिल्याबद्दल सरकारच्या कारणे दाखवा नोटीसला असे विचित्र उत्तर दिल्याने मध्य प्रदेशच्या सतना येथील एका सरकारी शाळेतील शिक्षक अडचणीत आलेत. शिक्षकाला तातडीने निलंबित करण्यात आले.
अखिलेश कुमार मिश्रा, ३५ यांना इतर शिक्षकांप्रमाणेच निवडणूक कर्तव्य बजावण्याचे आदेश मिळाले. १६-१७ ऑक्टोबर रोजी प्रशिक्षण सत्रदेखील झाले, पण मिश्रा अनुपस्थित राहिले होते. त्यामुळे देशासाठी महत्त्वाच्या असलेल्या कामात निष्काळजीपणा केल्याबद्दल निलंबित का करू नये, अशी कारणे दाखवा नोटीस त्यांना बजावण्यात आली होती. त्याच्या उत्तरात, शिक्षकाने ३१ ऑक्टोबर रोजी ‘पॉइंट टू पॉइंट’ या शीर्षकाचे पत्र लिहिले.
त्यात “माझं संपूर्ण आयुष्य बायकोशिवाय गेलं आहे, माझ्या रात्री वाया गेल्या. आधी माझं लग्न लावून द्या. हुंडा म्हणून ३.५ लाख रुपये, ‘रोख किंवा खात्यात भरणा’ आणि ‘रेवा जिल्ह्यातील सिंगरौली टॉवर किंवा समदरिया’ येथे फ्लॅटसाठी कर्ज मंजुरीची मागणी करत आहे.” पत्राच्या अखेरीस, “काय करू? माझ्याकडे शब्द नाहीत, तुम्ही ज्ञानाचा महासागर आहात” असे लिहिले. या उत्तरामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षकाला २ नोव्हेंबर रोजी निलंबित केले.