नवी दिल्ली - राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांनी आज शपथ घेतली. कोरोना संसर्गामुळे हा कार्यक्रम राज्यसभेत न होता, राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या दालनात सकाळी ११ वाजता या शपथविधी सोहळ्याला सुरुवात झाली. देशातील 20 राज्यांमधून निवडून आलेल्या 62 खासदारांनी आज शपथ घेतली. त्यामध्ये, महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, आरपीआयचे रामदास आठवले, भाजपा नेते उदयनराजे भोसले, काँग्रेस नेते राजीव सातव आणि शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी यांनीही खासदारकीची शपथ घेतली.
खासदार उदयनराजे भोसलेंनी खासदारकीची शपथ घेण्यापूर्वीच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. शरद पवार यांनी राम मंदिराबाबत केलेल्या विधानावरुन न्यूज 18 लोकमतशी बोलताना त्यांनी पवारांना लक्ष्य केले. 'भारतासारख्या एवढ्या मोठ्या देशात सर्व जातींमध्ये सलोखा राहिला पाहिजे. प्रत्येकाला आपल्या विचाराचे स्वतंत्र आहे', असं म्हणत त्यांनी शरद पवारांच्या राम मंदिराच्या भूमिपूजनाबाबत विधानावर साधारण प्रतिक्रिया दिली.
'कोरोनाचा कठीण काळ आहे.पण घरी थांबून चालणार नाही. आतापर्यंत लोकांना केंद्रबिंदू म्हणूनच आजवर काम करत आलो. जेव्हा पद नव्हतं तेव्हा समाजकारण केलं, राजकारण कधीच केले नाही. गेल्या तीस वर्षात जेवढी समाजाची सेवा करता येईल तेवढी केली. राज्यसभेच्या संधीचा पुरेपूर लोकहितासाठी वापर करेन. केवळ सातारा नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी काम करत राहीन' असेही उदयनराजेंनी म्हटले. तसेच, 'कोरोनावर लवकरात लवकर लस निघाली पाहिजे. लॉकडाउनमुळे लोकांचे रोजगार हिरावले आहेत. किती दिवस सांगणार लोकांना घरात बसून राहा, उद्या कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल' अशी भीतीही त्यांनी बोलून दाखवली.
अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाची तयारी सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या बाबीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला होता. मंदिर बांधून कोरोना जाणार नाही असे विधान शरद पवार यांनी केले होते. पवार यांच्या या विधानानंतर उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. तर, विरोधकांनी शरद पवार यांच्या या विधानावरुन त्यांना टार्गेट केलंय.