अंगावर उड्या मारल्या, लाथा मारल्या; पैशांवरुन तृतीयपंथीयांनी तरुणाला ट्रेनमधून बाहेर फेकलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 09:37 IST2025-03-22T09:31:04+5:302025-03-22T09:37:04+5:30
मध्य प्रदेशात तृतीयपंथीयांनी एका तरुणाची धावत्या ट्रेनमध्ये मारहाण करुन हत्या केल्याची घटना घडली आहे.

अंगावर उड्या मारल्या, लाथा मारल्या; पैशांवरुन तृतीयपंथीयांनी तरुणाला ट्रेनमधून बाहेर फेकलं
Madhya Pradesh Crime: रेल्वे गाड्यांमध्ये अनेकदा तृतीयपंथीयांकडून पैसे मागताना अरेरावी केली जात असल्याचे अनेकदा समोर आलं आहे. लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये घोळक्याने असणारे तृतीयपंथी पैसे न देणाऱ्या व्यक्तीला धमकावत मारहाण करण्याच्या घटना घडल्या आहेत. मध्य प्रदेशच्या भोपाळ - विदिश बासोदादरम्यान, काही तृतीयपंथीयांनी एका प्रवाशाची हत्या करून ट्रेनमधून फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून कुटुंबियांकडून कारवाईची मागणी केली जात आहे.
विदिशाच्या अयोध्या बस्तीमध्ये राहणाऱ्या २३ वर्षीय आदर्श विश्वकर्मा या तरुणाला तृतीयपंथीयांनी ट्रेनमध्ये बेदम मारहाण केली. १३ मार्चला हा सगळा धक्कादायक प्रकार घडला. तृतीयपंथीयांनी आदर्शला ट्रेनमध्ये केलेल्या मारहाणीचा व्हिडिओही व्हायरल झालाय. व्हिडीओमध्ये काही तृतीयपंथी आदर्शच्या अंगावर उड्या मारताना दिसत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे या घटनेला सात दिवस उलटून गेले, तरी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला नसल्याची माहिती समोर आली. याप्रकरणी आदर्शच्या भावाने पोलिसांनी निवेदन देऊन कारवाईची मागणी केली.
आदर्श भोपाळमध्ये इलेक्ट्रिकलच्या दुकानात काम करायचा. तो ट्रेनने अप-डाऊन करायचा. १३ मार्चच्या रात्री तो भोपाळहून गोंडवाना एक्स्प्रेसने घरी येत होता. त्यावेळी भोपाळहून ट्रेनमध्ये चढलेल्या तृतीयपंथीयांनी सलामतपूर सांचीजवळ त्याच्याकडे पैसे मागितले. आदर्शने त्यांना पैसे देण्यास नकार दिला तेव्हा तृतीयपंथीयांनी थेट त्याच्या खिशात हात घातला. आदर्शने याला विरोध केला असता कोचमध्ये असलेल्या ८ ते १० तृतीयपंथीयांनी त्याच्यावर हल्ला चढवला आणि त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली.
मारहाण करताना तृतीयपंथीयांनी आदर्शचे कपडे फाडले आणि त्याला खाली पाडलं. यावेळी काही तृतीयपंथीयांनी त्याच्या अंगावर उड्या मारल्या. त्याला पोटात, तोंडावर लाथा मारण्यात आला. कोचमधील इतर लोक तो मरुन जाईल. सोडून द्या असं ओरडत होते. तरीही तृतीयपंथीयांनी ऐकलं नाही आणि मारहाण सुरुच ठेवली. मारहाणीदरम्यान, आदर्श निपचित पडून होता. त्यानंतर विदिशा येथे ट्रेन थांबल्यावर तृतीयपंथीयांनी त्याला उतरू दिले नाही. गंजबासोडा येथे आदर्शला तृतीयपंथीयांनी ट्रेनच्या बाहेर फेकून दिलं. रेल्वे पोलिसांना गंजबासोडा येथे आदर्शचा मृतदेह सापडला. दुसऱ्या दिवशी दुपारी २ वाजेपर्यंत मृतदेह तेथेच पडून होता, असा आरोप आदर्शच्या भावाने केला.