मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाने (MPPSC) राज्य सेवा परीक्षा 2019 चा निकाल जाहीर केला आहे. सिहोर जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील मुलगा आशुतोष त्यागी यांची डीएसपी पदासाठी निवड झाली आहे. डीएसपी झाल्यानंतर त्यांचे कुटुंबीय आणि परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. आशुतोष यांनी याचं श्रेय आई-वडील आणि कुटुंबीयांना दिलं आहे. टिटोरा गावात जन्मलेले संजय त्यागी यांचे पुत्र आशुतोष त्यागी यांना शुभेच्छा देण्यासाठी लोकांची मोठी गर्दी होत आहे.
आशुतोष वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी डीएसपी बनले आहेत. आशुतोष म्हणाले की, मेहनत करत राहिलं पाहिजे, त्याचं फळ नक्कीच मिळतं. दीड वर्षांपूर्वी त्यांची ग्रामीण कृषी विस्तार अधिकारी पदासाठीही निवड झाली होती. ते काम आजही ते यशस्वीपणे करत आहेत. आता त्यांची मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेत डीएसपी पदासाठी निवड झाली आहे.
वडील संजय त्यागी यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा मुलगा आशुतोष यांचे प्राथमिक शिक्षण टिटोरा गावात झाले. त्यानंतर त्यांनी सिहोर येथील खासगी शाळेत शिक्षण घेतलं. बीएस्सी एग्रीकल्चर शिकण्यासाठी इंदूरच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. या यशाचे श्रेय ते त्यांच्या पालकांना देतात, ज्यांच्यामुळेच ते इथपर्यंत पोहोचले आहेत. मध्य प्रदेश लोकसेवा आयोग 2019 च्या परीक्षेत डीएसपीसाठी निवड करण्यात आली आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. घरातील सर्वांनी मला अभ्यासासाठी प्रोत्साहन दिलं असं म्हटलं.
तरुणांना संदेश देताना आशुतोष त्यागी म्हणाले, मोठी स्वप्नं पाहा. जीवन वेगाने पुढे जात आहे. अभ्यासासोबतच ध्येय निश्चित करून पुढे जायला हवं. माझ्या आजोबांनी मला कुटुंबासाठी नाही तर लोकांसाठी काहीतरी करण्याची प्रेरणा दिली होती. तीन-चार वर्षांच्या प्रदीर्घ परिश्रमानंतर आज यश मिळालं आहे. माझी डीएसपीसाठी निवड झाली आहे. क्रमवारी अव्वल 25 च्या आसपास आली आहे. कॉलेजसोबतच मी पीएससीची तयारीही सुरू केली. नियमित वेळापत्रकानुसार अभ्यास केला. आजतकने याबाबतचे वृत्त दिले आहे.