काही लोक आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम करतात आणि घवघवीत यश मिळवतात. अशीच एक प्रेरणादायी गोष्ट समोर आली आहे. प्रियल यादव या एकेकाळी अकरावीत नापास झाल्या होत्या. पण आता मध्य प्रदेश लोकसेवा आयोग (MPPSC) परीक्षेत सहावा रँक मिळवून उपजिल्हाधिकारी झाल्या आहेत. शेतकऱ्याच्या लेकीने हे नेत्रदिपक भरारी घेतली आहे.
प्रियल यांचे वडील शेतकरी आहेत आणि आई गृहिणी आहे. त्या ग्रामीण भागातून आल्या आहेत जिथे मुलींची लहान वयातच लग्न होतात, परंतु त्यांच्या पालकांनी त्यांच्यावर लग्नासाठी दबाव आणला नाही आणि करिअर करण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य दिलं. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, २०२१ च्या MPPSC परीक्षेत उपजिल्हाधिकारी म्हणून निवडलेल्या टॉप १० उमेदवारांपैकी प्रियल एक होत्या.
प्रियल यांना आता आयएएस अधिकारी बनण्याची इच्छा आहे. राज्यात उपजिल्हाधिकारी म्हणून काम करताना UPSC परीक्षांची तयारी करणं हा त्यांचा उद्देश आहे. प्रियल यांनी २०१९ मध्ये राज्य सेवा परीक्षा दिली, ज्यामध्ये १९ वा रँक मिळविला आणि त्या डिस्ट्रिक्स रजिस्ट्रार बनल्या. पण त्या खूश झाल्य़ा नाहीत, त्यांनी पुन्हा तयारीला सुरुवात केली.
प्रियल यांनी २०२१ मध्ये पुन्हा परीक्षा दिली आणि उपजिल्हाधिकारी झाल्य़ा. एक वेळ अशी होती जेव्हा अकरावीत त्या नापास झाल्या होत्या. दहावीपर्यंत त्या वर्गात टॉप करायच्या पण अकरावीत फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स विषय निवडले. त्यांना यामध्ये रस नव्हता. त्यामुळेच त्या नापास झाल्या. पण या गोष्टीचा त्यांना मोठा धक्का बसला होता.