नवी दिल्ली : मणिपूरमध्ये 3 मे रोजी सुरू झालेला हिंसाचार आतापर्यंत सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या 'इंडिया'च्या २१ खासदारांचा मणिपूर दौरा केला होता. आज या खासदारांचा मणिपूर दौरा आज संपला. दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी रविवारी इंफाळमध्ये मणिपूरच्या राज्यपाल अनुसुईया उईके यांची भेट घेऊन सर्व खासदार दिल्लीला परतले आहेत.
दिल्लीत पोहोचलेल्या विरोधी पक्षाच्या खासदारांनी सांगितले की, मणिपूरमधील परिस्थिती अत्यंत वाईट आहे आणि दोन (कुकी आणि मैतेई) समुदायांमध्ये अजूनही तणाव आहे. तसेच, राज्यातील अनेक भागात संध्याकाळ होताच गोळीबाराचे आवाज येऊ लागतात, असा दावा खासदारांनी केला. सर्व विरोधी खासदारांनी मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
सध्या राज्यात राष्ट्रपती राजवटीची गरज असल्याने बिरेन सिंह यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, असे खासदारांनी सांगितले. तसेच, परिस्थिती इतकी बिकट आहे की राज्याचे राज्यपालही हतबल होऊन काहीही करू शकत नाहीत. मणिपूरमधील परिस्थिती अत्यंत गंभीर असूनही केंद्र सरकार शांत बसले आहे, असा आरोप सुद्धा खासदारांनी केला आहे.
मणिपूर दौऱ्यात विरोधी खासदारांच्या टीममध्ये सहभागी असलेले काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी राज्यातील परिस्थिती अत्यंत दयनीय असल्याचे म्हटले आहे. अधीर रंजन चौधरी म्हणाले की, संपूर्ण मणिपूर जळत आहे आणि देशाचे पंतप्रधान बासरी वाजवत आहेत. मोठमोठ्या चर्चा होत आहेत, पण मणिपूरबाबत मौन आहे. सरकार डोळे मिटून बसले आहे, तातडीने ठोस पावले उचलली नाहीत तर परिस्थिती हाताबाहेर जाईल.
मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी - मनोज झायाचबरोबर, आरजेडीचे खासदार मनोज झा म्हणाले की, मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, अशी आमची इच्छा आहे. दोन्ही समुदायाने राज्यात सामंजस्याने राहावे, एवढीच आमची मागणी आहे. तेथील परिस्थिती अधिक धोकादायक आहे. यावर सर्वतोपरी समर्थन केले जाईल, अशी चर्चा यापूर्वीच संसदेत झाली आहे. पक्षाच्या शिष्टमंडळाने मणिपूरलाही भेट द्यावी, असे त्यांनी म्हटले आहे.
आतापर्यंत १५० हून अधिक लोकांचा मृत्यू मणिपूरमध्ये ३ मे रोजी कुकी समुदायाकडून आदिवासी एकता रॅली काढण्यात आली होती. या रॅलीदरम्यान कुकी आणि मेईतेई समुदाय आमनेसामने आले आणि काही वेळातच हाणामारीचे रूपांतर हिंसाचारात झाले. राज्याच्या विविध भागात हजारो घरे आणि दुकाने जाळण्यात आली. या हिंसक संघर्षात आतापर्यंत १५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. हजारो लोकांना मदत छावण्यांमध्ये राहावे लागले आहे. मात्र, राज्यात शांतता राखण्यासाठी सरकारकडून लष्करही तैनात करण्यात आले आहे.