नवी दिल्ली : पर्यावरण प्रदूषणाचा नकारात्मक परिणाम हे एक मोठे आव्हान आहे, असे नमूद करून पर्यावरणाच्या संरक्षणासाठी सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करण्याची गरज असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.पर्यावरणाची चर्चा दीर्घ काळापासून सुरू आहे; परंतु त्याचा सामान्य मानवी जीवनावरील नकारात्मक प्रभाव मागील काही दिवसांपासून जाणवू लागला आहे. त्यामुळे हा चिंतेचा विषय बनला आहे. या समस्येवर उपाय शोधणे हे मोठे आव्हान आहे, असे मोदी म्हणाले. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयातर्फे लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांना भेट देण्यात आलेल्या इलेक्ट्रिक बसला हिरवी झेंडी दाखविताना मोदी बोलत होते. या इलेक्ट्रिक बसचा वापर खासदारांना संसदेत नेण्यासाठी केला जाईल. पर्यावरण आणि तंत्रज्ञानात भरीव योगदान दिल्याबद्दल मोदी यांनी भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांचे अभिनंदन केले. सार्वजनिक परिवहनामध्येही तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाऊ शकतो, असे सांगून ते म्हणाले, या इलेक्ट्रिक बसमुळे केवळ वायुप्रदूषण कमी होणार नाही, तर युवा पिढीला संशोधन करण्यास आणि बॅटरीज निर्माण करण्यासाठी प्रोत्साहनही मिळेल.
खासदारांच्या इलेक्ट्रिक बसचा शुभारंभ
By admin | Published: December 22, 2015 2:41 AM