लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशाचे १५वे राष्ट्रपती निवडण्यासाठी साेमवारी सर्व राज्यांमध्ये मतदान झाले. मतदानानंतर विविध राज्यांमधील मतपेट्या राजधानी दिल्लीत विमानाने पाठवण्यात आल्या. प्रत्येक मतपेटी विमानातील समाेरच्या सीटवर माेठ्या ऐटीत विराजमान झाली आहे. कारणही तसेच हाेते. ‘मिस्टर बॅलट बाॅक्स’ या नावाने त्यांचे तिकीट बुक केले हाेते ना!
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी प्रत्येक राज्याच्या विधान भवनात आमदार आणि खासदारांनी मतदान केले. ही निवडणूक ईव्हीएमच्या माध्यमातून न हाेता मतपत्रिकांद्वारे घेण्यात येते. मतमाेजणी २१ जुलैला नवी दिल्लीत हाेणार आहे. त्यासाठी विविध राज्यांमधून मतपेट्या विमानांमधून राजधानीत नेण्यात आल्या. त्यासाठी कडेकाेड सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली हाेती. संबंधित राज्यातील निवडणूक अधिकारी आणि मतपेट्यांच्या नावाने स्वतंत्र तिकीट काढण्यात आले हाेते. मतपेटीचे तिकीट ‘मिस्टर बॅलेट बाॅक्स’ या नावाने हाेते. तर त्याच्या बाजूची जागा निवडणूक अधिकाऱ्यांच्या नावाने बुक करण्यात आली हाेती. विमानाच्या पहिल्या रांगेत ‘मिस्टर बॅलेट बाॅक्स’ला जागा देण्यात आली हाेती. मतदानासाठी मतपेट्या संबंधित राज्यांमध्ये पाठविण्यात आल्या, त्यावेळीदेखील ‘मिस्टर बॅलेट बाॅक्स’च्या नावाने स्वतंत्र तिकीट काढण्यात आले हाेते.
या राज्यांतून झाला विमानप्रवास
महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आसाम आणि राजस्थान येथून मतपेट्या स्वतंत्र व्यावसायिक विमानांमधून दिल्लीत आणण्यात आल्या. हिमाचल प्रदेशातील मतपेट्या रस्ते मार्गे चंडीगड येथे आणि तेथून विमानातून दिल्लीत आणण्यात आल्या. ज्या राज्यांमधून थेट उड्डाण नाही, तेथून मतपेट्या मंगळवारी उशिरापर्यंत दिल्लीत दाखल झाल्या.
‘मिस’ बॅलट बॉक्स का नाही?
'राष्ट्रपतिपदासाठी मतदान शांततेत पार पडल्यानंतर, मिस्टर बॅलट बॉक्स संबंधित एआरओंसह दिल्लीला विमानाने निघाले!' असे ट्विट निवडणूक आयोगाने केले, सोबत फोटोही शेअर केले. त्यानंतर, 'मिस्टर बॅलट बॉक्स' नावाचे विमान तिकीट सोशल मीडियात व्हायरल झाले. त्यावर नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या. तिकीट बुक करताना 'मिस' बॅलट बॉक्स नाव का नाही वापरले, अशी चर्चा रंगली. तर, ईव्हीएमचा वापर का नाही केला, अशी विचारणाही अनेकांनी केली.