बनवाबनवी, चोरी, फसवणूक या माध्यमातून देशभरात धुमाकूळ घालणारा आणि सुपर नटवरलाल, इंडियन चार्ल्स शोभराज या नावाने कुप्रसिद्ध झालेला कुख्यात चोर धनीराम मित्तल याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. तो ८५ वर्षांचा होता. कायद्याची पदवी, हस्तलेखन तज्ज्ञ आणि ग्राफोलॉजिस्ट अशी उच्चशिक्षित पार्श्वभूमी असतानाही धनीराम याने चोरीचा मार्ग निवडला होता.
धनीराम मित्तल याचा जन्म हरियाणामधील भिवानी येथे १९३९ मध्ये झाला होता. धनिराम याने दिल्ली, हरियाणा, राजस्थान, चंडीगड आणि पंजाब या राज्यांमधून सुमारे १ हजारांहून अधिक कार चोरल्याचे सांगितले जाते. धनीराम हा एवढा सराईत होता की दिल्ली, राजस्थान, हरियाणा आणि आसपासच्या परिसरातून दिवसाढवळ्या चोरी करायचा. त्याशिवाय धनिराम याच्याविरोधात फसवणुकीचेही १५० हून अधिक गुन्हे दाखल होते.
मनीराम याने वकिलीची पदवी मिळवली होती. तसेच हस्तलेखनाची नक्कल करण्यात तो पटाईत होता. त्याने बनावट कागदपत्रांच्या मदतीने रेल्वेमध्ये नोकरीही मिळवली. तसेच १९६८ ते ९१७४ या काळात स्टेशन मास्तर म्हणून कामही केलं होतं. हे कमी म्हणून काय त्याने बनावट पत्राच्या मदतीने न्यायाधीशाची खुर्जी मिळवत तब्बल २२७० आरोपींना जामीन मिळवून दिला होता.
ही घटना १९७० च्या आसपासची आहे. तेव्हा धनीराम याने झज्जरच्या अतिरिक्त न्यायाधीशांविरोधात विभागीय चौकशीचं वृत्त वाचलं. त्यानंतर त्याने एक पत्र लिहून ते सिलबंद लिफाफ्यात घालून त्यावर हायकोर्टाच्या रजिस्ट्रारचा शिक्का मारला. तसेच ते चौकशी सुरू असलेलेल्या न्यायाधीशाला पाठवले. न्यायाधीशांनाही हे पत्र खरं वाटलं. तसेच त्यातील आदेश मानून ते सुट्टीवर गेले. इकडे धनीराम याने पुढची चाल खेळत त्याच कोर्टामध्ये आणखी एक पत्र पाठवलं. तसेच त्यामध्ये सुट्टीवर गेलेल्या न्यायाधीशांच्या जागी नव्या न्यायाधीशांच्या नियुक्तीच्या आदेशाची नोंद केली. तसेच स्वत: कोर्टात न्यायाधीश म्हणून हजर झाला. कोर्टातील कर्मचारी वर्गाने त्याला खरा न्यायाधीश मानले. तिथे त्याने ४० दिवस धुमाकूळ घातला. तसेच हजारो खटल्यांची सुनावणी करताना २७४० आरोपींना जामीन दिला. एवढंच नाही तर स्वत:विरोधातील खटल्याची स्वत:च सुणावणी केली. तसेच स्वत:ची निर्दोष मुक्तता करून घेतली. मात्र अधिकारी वर्गाला कुणकूण लागण्यापूर्वीच धनीराम तिथून पसार झाला.