Sambhal Latest News: गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशातील संभल बातम्या आणि चर्चेचा विषय ठरत आहे. संभलमध्ये सुरू असलेल्या खोदकामात मंदिरं, जुन्या विहिरी आढळून आल्या आहेत. गुरुवारी संभलमध्ये मृत्यू कूप सापडला. तिथे बाजूला शिव मंदिर असल्याचा दावाही करण्यात आला आहे. प्रशासनाने या मृत्यू कूप खोदण्यास आणि जिर्णोद्धाराचे काम सुरू केले आहे.
शाही जामा मशीद सर्व्हेक्षण मुद्द्यावरून संभल चर्चेमध्ये आले. त्यानंतर प्रशासनाने येथे पाहणी आणि खोदकाम सुरू केले आहे. आतापर्यंत काही मंदिरं, विहिरी आणि बारव सापडले आहेत. गुरूवारी प्रशासनाला एक कूप सापडला. हा मृत्यू कूप असल्याचे सांगण्यात आले.
उत्तर प्रदेशातील संभल प्राचीन काळात तीर्थांचे केंद्र होते. याचा पौराणिक कथांमध्ये उल्लेख आहे. पौराणिक कथांनुसार, संभलमध्ये ८४ कोसी नदी परिक्रमा मार्ग, ६८ तीर्थ आणि १९ कूप अस्तित्वात होते. त्याचे धार्मिक महत्त्व होते.
बदलत्या काळात येथून हिंदूंचे स्थलांतर होत गेले. त्यामुळे मंदिरं ओसाड पडली आणि विहिरी बारव मातीने बुजली गेली. आजघडीला संभलमध्ये ३ तीर्थ अस्तित्वात आहेत, ज्याची परिक्रमा आणि दर्शन घेण्यासाठी देशभरातून लोक येतात. अशा पौराणिक कथा आहेत की, पंच कोसी यात्रा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात.
मृत्यू कूपचे धार्मिक महत्त्व काय?
संभलमधील मृत्यू कूपबद्दल काही पौराणिक कथा आहे. या कथांमध्ये असे म्हटले गेले आहे की, येथे स्नान केल्याने मोक्ष मिळतो. या भागाचे नगरसेवक गगन वाष्णेय यांनी सांगितले की, 'आज संभलमध्ये ऐतिहासिक मृत्यू कूपचे खोदकाम सुरू झाले आहे. हा प्राचीन कूप आहे. हे खोदकाम नगरपालिकेच्या मदतीने सुरू आहे. धार्मिक मान्यता अशी आहे की, इथे स्नान केल्याने माणसाला मोक्ष प्राप्त होतो.'
संभलमध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या तीन तीर्थ कोणती?
संभलपासून तीन ते चार किमी अंतरावर वंशगोपाल मंदिर आहे आहे. ते बेनीपूर कमलपूर गावात आहे. हे मंदिर श्रीकृष्णाचे असून, प्राचीन काळापासून पंचक्रोशी परिक्रमा या मंदिरापासून सुरू होते. या परिक्रमेत संभलशिवाय इतर ठिकाणचे लोकही सहभागी होतात. इथे पूजा केल्याने अपत्य प्राप्ती होते, असे म्हणतात.
तीन तीर्थांपैकीच दुसरे आहे सूर्यकुंड तीर्थ. याला अर्ककुंड तीर्थ म्हणून ओळखले जाते. २४ कोसी परिक्रमा करण्यासाठी लोक येतात. दिवाळीनंतर दोन दिवसांनी ही परिक्रमा सुरू होते. येथे यात्राही भरते. येथे स्नान केल्याने पाप धुतले जातात, अशी पौराणिक मान्यता आहे.
मृत्युजंय तीर्थ हे संभलमधील हयातनगरमध्ये आहे. इथे पूजा, स्नान केल्यानं अकाली मृत्यू होत नाही, असे म्हणतात. त्याचबरोबर येथे स्नान करणाऱ्यांना लोकांना मृत्यूनंतर स्वर्गात स्थान मिळते, अशाही कथा आहेत.