ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 23 - अघोषित मालमत्तेप्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांची ज्येष्ठ कन्या आणि राज्यसभा सदस्य मिसा भारतींच्या अडचणीत वाढ झालीय. 8 हजार कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी भारती यांचे सीए राजेश अग्रवाल याला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बेड्या ठोकल्या आहेत. ईडीने राजेश अग्रवालला दिल्लीतील पटियाळा हाऊस न्यायालयासमोर हजर केले असता त्यांचे राजकीय पक्षांबरोबर संबंध असल्याचं समोर आलं आहे. प्राप्तिकर विभागाने दिल्ली आणि गुरुग्राम येथे सोमवारी लालूप्रसाद यादव यांच्याशी संबंधित कंपन्या अशा सुमारे 22 ठिकाणी छापे मारले होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे छापे 1 हजार कोटींच्या अघोषित मालमत्तेच्या व्यवहाराच्या आरोपावरून हे छापे मारण्यात आले होते. गेल्या 15 वर्षांत डझनांहून अधिक बनावट कंपन्यांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांचा काळा पैसा पांढरा केल्याचा आरोप आहे.राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांच्याविरोधात प्राप्तिकर विभागाने मोठी कारवाई केली होती. नवी दिल्ली, गुडगावमध्ये लालू प्रसाद यादव यांच्याशी संबंधित असलेली लोकं व कंपनी अशा जवळपास 22 ठिकाणांवर आयकर विभागाने कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी प्राप्तिकर विभागानं ही कारवाई केली आहे. 1 हजार कोटी रुपयांच्या बेनामी जमिनीचा व्यवहार केल्याचा लालू प्रसाद यादव यांच्यावर आरोप आहे.
बिहारमधील भाजपाचे नेते सुशीलकुमार मोदी यांनी लालूंच्या बेहिशेबी संपत्तीसंदर्भात अनेक गौप्यस्फोट केले होते. मात्र नितीशकुमार सरकारनं चौकशीनंतर त्यांना क्लीन चिट दिली होती. सोबत राजदचे नेते प्रेम चंद गुप्ता यांच्यांशी संबंधित असलेल्या कार्यालयांवरही छापेमारी करण्यात आली आहे. एकूणच यामुळे लालू प्रसाद यादव यांच्या अडचणी वाढणार असल्याचे दिसत आहे.