रांची: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीची पत्नी साक्षी धोनीनं पिस्तुलासाठी अर्ज केला आहे. मी अधिकवेळा घरी एकटी असते आणि त्यामुळे माझ्या जीवाला धोका आहे, असं साक्षीनं पिस्तुलाच्या परवान्यासाठी केलेल्या अर्जात म्हटलं आहे. साक्षीनं 0.32 रिव्हॉल्वरसाठी अर्ज केला आहे. साक्षी धोनीनं परवान्यासाठी दंडाधिकारी कार्यालयात अर्ज केला होता. हा अर्ज अल्गोडा पोलीस ठाण्यात पाठवण्यात आला आहे. यानंतर पोलिसांनी साक्षीची चौकशी केली. यात तिच्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल नसल्याची माहिती मिळाली. यानंतर या प्रकरणाची फाईल डीएसपी कार्यालयाकडे पाठवण्यात आली. सध्या ही फाईल शहराच्या आयुक्तांकडे आहे. आता लवकरच ही फाईल एसएसपी कार्यालय आणि त्यानंतर रांचीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवली जाईल. महेंद्र सिंह धोनी सध्या रातूमधील दलादिलीमधील फार्महाऊसमध्ये वास्तव्यास आहे. हे आलिशान फार्महाऊस एक एकर परिसरात बांधण्यात आले आहे. धोनीचं हे घर शहरापासून दूर आहे. या फार्महाऊसवर अत्याधुनिक शस्त्र असलेले सात सुरक्षारक्षक तैनात आहेत. धोनीची पत्नी ज्यावेळी घराबाहेर पडते, त्यावेळी याबद्दलची माहिती स्थानिक पोलीस ठाण्याला दिली जाते. यानंतर साक्षी धोनीला पोलीस सुरक्षा पुरवली जाते.
धोनीच्या पत्नीला हल्ल्याची भीती; पिस्तुलाच्या परवान्यासाठी केला अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2018 12:49 PM