ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि.6 - देशात दादरीसारख्या घडलेल्या काही घटनांमुळे अल्पसंख्याक समाजातील मोदी सरकारविषयीचा गैरसमज दूर करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच, अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी भाजपा सरकारला अडचणी आणणारे वक्तव्य केले आहे. 'देशात अल्पसंख्याकांना कधीकधी दुय्यम नागरिक असल्यासारखे वाटते', असे मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटले आहे. बुधवारी राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी 'शेजारच्या देशांवर नजर टाकली तर,अल्पसंख्याकांच्या अधिकारांसाठी भारत हा आदर्श देश असल्याचे लक्षात येईल. देशाच्या राज्यघटनेने सर्वांना समान हक्क दिले असले तरी त्यामध्ये काहीतरी उणीवा जाणवतात. त्यामुळे कधीकधी आम्हाला या देशाचे दुय्यम नागरिक असल्यासारखे वाटते. अनेकदा मूळ प्रश्नांना मूठमाती दिली जाते, असे नक्वींनी म्हटले.
केलेल्या विधानामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात, हे लक्षात आल्यानंतर नक्वींनी लगेचच सारवासारव सावरण्याचा प्रयत्न केला. 'माझे हे विधान सामाजिक परिस्थितीला नव्हे तर व्होटबँकेच्या राजकारणाला धरून होते', अशी सारवासारव नक्वींनी केली . तसंच देशातील अल्पसंख्याकांना देशभक्तीच्या प्रमाणपत्राची गरज नाही. कडव्या विचारसणीच्या लोकांना महत्त्व न देत त्यांनी ते सिद्ध करुन दाखवले आहे, असे नक्वी यांनी यावेळी स्पष्ट केले.