नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले असून रुग्णांचा आकडा तब्बल एक कोटींवर पोहोचला आहे. तर जवळपास दीड लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देश सध्या कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत असताना आणखी एका आजाराचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनावर मात केलेल्या रुग्णांना एका नव्या आजारामुळे आपला जीव गमवावा लागत आहे. 'म्यूकोरमिकोसिस' (Mucormycosis) असं या आजाराचं नाव असून यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
रिपोर्टनुसार, कोरोनानंतर 'म्यूकोरमिकोसिस' हा आजार वेगाने पसरत आहे. गुजरात अहमदाबादमध्ये एकूण 44 जणांना या आजाराची लागण झाली असून 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. म्यूकोरमिकोसिस हे एक फंगल इन्फेक्शन आहे. या आजारातील रुग्णांची किटाणूंशी लढण्याची क्षमता कमी होते. दिल्ली, मुंबई आणि अहमदाबादमधील रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी देखील याबाबत एक ट्विट केलं आहे. म्यूकोरमिकोसिस आजाराचा डोळ्यांवर सर्वात जास्त परिणाम होतो. योग्य उपचार न झाल्यास डोळे कायमचे निकामी होऊ शकतात. दिल्लीतल्या सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये या आजाराची लागण झालेले 13 रुग्ण दाखल झाले आहेत. यापैकी काही रुग्णांचे डोळे निकामी झाले आहेत. तसेच काहींच्या मेंदूलाही धोका निर्माण झाला असल्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.
देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 25,153 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर काही जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,45,136 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र आता म्यूकोरमिकोसिस आजाराचा धोका निर्माण झाला आहे. मधुमेहाचे रुग्ण किंवा ज्यांची प्रतिकार शक्ती कमी आहे, अशा रुग्णांना याचा धोका आहे. कोरोनामधून बरं झालेल्या रुग्णांमध्येही या आजाराची लक्षणं आढळून आल्याने चिंतेत भर पडली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.