नवी दिल्ली : मॅगी नूडल्स आरोग्यासाठी फार पोषक असतात, अशी जाहिरात केल्याबद्दल चित्रपट अभिनेत्री माधुरी दीक्षित-नेने हिला हरिद्वारच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) नोटीस बजावली आहे. फिट राहण्याचा माधुरीचा सल्ला तिच्यासाठी आता ‘विकतची डोकेदुखी’ ठरू शकतो.या जाहिरातीत मॅगीमधील ज्या पोषक तत्त्वांचा दावा करण्यात आला आहे, त्यासंदर्भात खुलासा करण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. तिने या कालावधीत नोटिशीला उत्तर न दिल्यास तिच्याविरुद्धही गुन्हा नोंदविला जाऊ शकतो, असे अन्न सुरक्षा अधिकारी महिमानंद जोशी यांनी सांगितले.उत्तर प्रदेशातील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या तपासणीत मॅगीच्या नमुन्यांमध्ये मोनो सोडियम, ग्लॅटामेट आणि शिशाचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आढळून आले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)च्मॅगी नूडल्सच्या गुणवत्तेबाबतचा मुद्दा केंद्र सरकारने गंभीरपणे घेतला असून, अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकरणाकडे (एफएसएसएआय) हे प्रकरण सोपवण्यात येणार आहे.च्ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी शुक्रवारी याबाबत माहिती दिली. हे प्रकरण एफएसएसएआयला सोपविण्यासोबतच, यासंदर्भात कुणी राष्ट्रीय ग्राहक तक्रारनिवारण आयोगाकडे गेल्यास यावर वेगळी कारवाई केली जाऊ शकते, असे त्यांनी सांगितले. च्विद्यमान कायद्याअंतर्गत एफएसएसएआयकडे कारवाईचे अधिकार आहेत. याअंतर्गत दंड आणि कठोर शिक्षेची तरतूद आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘मॅगी’ जाहिरातीबद्दल माधुरीला नोटीस
By admin | Published: May 30, 2015 2:10 AM