लखनऊ, दि. 12 - भारतात राज्य करणारे मुघल आपले पूर्वज नसून एकप्रकारचे लुटारु होते आणि आता असाच इतिहास यापुढे लिहिला जाणार असल्याचे उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी म्हटले आहे. येथील एका आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी दिनेश शर्मा म्हणाले की, मुघलांनी चांगली कामे केली आहेत, त्यांची आम्ही स्तुती सुद्धा करतो. मात्र, आपली संस्कृती मिटवता येणार नाही. आपल्याला इतिहास विसरुन चालणार नाही, असे केले तर विकृती निर्माण होण्याची शक्यता आहे. ज्या मुघलांनी चुकीची कामे केली आहेत, त्यांना आम्ही लुटारु म्हणतो. बाबर आणि औरंगजेब लुटारु होते. शाहजहॉं हात कापणारा व्यक्ती होता. मात्र, मंगल पांडे यांनी ज्यावेळी क्रांतीची सुरुवात केली, त्यावेळी बहादूर शाह जफर यांनी त्यांचे समर्थन केले होते. तसेच, बहादूर शहा जफर यांनी भारतात होणा-या गोहत्येला सुद्धा विरोध दर्शविला होता, असे आजतक या वृत्तवाहिनीच्या सफाईगिरी कार्यक्रमात दिनेश शर्मा बोलत होते.ते म्हणाले, आम्ही सर्व धर्मांचा सन्मान करतो. मी मंदिरात जाऊन पूजा करतो. तसेच, मशिद आणि गुरुद्वारामध्ये सुद्धा जातो. पंतप्रधान नरेंद्र मोगी बहादूर शाह जफर यांच्या दर्गात गेले होते, त्यावर बोलताना दिनेश शर्मा म्हणाले की, बहादूर शाह जफर एक चांगले मुघल शासक होते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्यानमारमधील त्यांच्या दर्गात गेले होते. तसेच, अबकरने चांगली कामे केली असतील तर ती इतिहासातील पानावर राहतील. याबाबत इतिहासकार निर्णय घेतील, असेही दिनेश शर्मा म्हणाले.
मुघल आपले पूर्वज नसून लुटारु होते, यापुढे असाच इतिहास लिहिला जाईल - दिनेश शर्मा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2017 6:32 PM