लखनऊ - भाजपा आमदार संगीत सोम यांच्या ताजमहाल संबंधीच्या वक्तव्याने सुरु झालेला वाद संपण्याची चिन्हे दिसत नसून रोज या वादामध्ये नवीन भर पडत आहे. आता उत्तर प्रदेशातील भाजपा खासदार विनय कटियार यांनी ताजमहाल हिंदू मंदिर असल्याचा दावा केला आहे. ताजमहाल ज्या जागेवर उभा आहे तिथे आधी शिव मंदिर होते. शिव मंदिर हटवून तिथे ताज महाल बांधण्यात आला असे विनय कटियार यांनी सांगितले.
मुगलांनी भारतात हिंदुची धार्मिक स्थळे उद्ध्वस्त केली. ताजमहालमध्ये हिंदू देवी-देवतांची चिन्हे आहेत. त्यामुळे ताजमहाल हिंदू मंदिर आहे असे विनय कटियार म्हणाले. 1990 च्या दशकात राम मंदिर आंदोलनाचा प्रसार-प्रचार करण्यात विनय कटियार आघाडीवर होते. राम मंदिर आंदोलनातील प्रमुख नेते अशी त्यांची ओळख होती.
कालच मंगळवारी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ताजमहाल भारतीयच असल्याचे स्पष्ट केले. ताजमहाल कोणी बांधला ? कशासाठी बांधला ? हे महत्वाचे नाही. ताजमहाल भारतीय मजुरांच्या रक्त आणि घामाने उभा राहिला आहे असे योगी म्हणाले होते. गी आदित्यनाथ यांनी घेतलेली भूमिका एकप्रकारे संगीत सोम यांच्यासाठी चपराक होती. संगीत सोम यांच्या विधानावरुन हा संपूर्ण वाद सुरु झाला होता.
ताजमहालबद्दल काय म्हणाले संगीत सोम उत्तर प्रदेशात एक अशी निशाणी आहे, जिला नाही म्हटलं पाहिजे. ताजमहालला ऐतिहासिक स्थळांच्या यादीत स्थान दिलं नाही म्हणून अनेकांना दु:ख झालं. कसला इतिहास, कुठला इतिहास, कुणाचा इतिहास ? तो इतिहास का, ज्यामध्ये ताजमहाल बनवणा-याने आपल्या बापाला कैद केलं होतं ? तो इतिहास का, ज्यामध्ये ताजमहाल बनवणा-याने उत्तर प्रदेश आणि हिंदुस्थानातील सर्व हिंदूंचा सर्वनाश करण्याचं काम केलं होतं ? अशा लोकांचं नाव जर आजही इतिहासात असेल, तर हे खूपच दुर्भाग्यपुर्ण आहे. मी गॅरंटी देऊन सांगतो की इतिहास बदलला जाईल'.
काय म्हणाल्या ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कांग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनीदेखील ताजमहालवरुन सुरु असलेल्या वादात उडी घेतली आहे. ममता बॅनर्जी यांनी भाजपावर निशाणा साधत म्हटलं आहे की, 'भारतीय संस्कृती आणि वारसा संपवण्यासाठी भाजपाने आखलेला हा राजकीय अजेंडा आहे'. ममता बॅनर्जी यांनी भाजपा आमदार संगीत सोम यांनी ताजमहालसंबंधी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. 'मुगलसराय स्थानकाचं नाव बदलून पंडित दिन दयाल उपाध्याय स्थानक करणा-या भाजपाने ताजमहालला का सोडलं ? त्याचं नाव का बदललं नाही ?' असा टोला ममता बॅनर्जी यांनी लगावला.