ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 7 - गेल्या वर्षी 8 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली होती. मात्र या नोटाबंदीचा फटका सर्वसामान्यांसोबत गर्भश्रीमंतांसह अब्जाधीशांनाही बसला आहे. नोटाबंदीनंतर देशातल्या अब्जाधीशांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. अब्जाधीशांची संख्या 11नं घटली असून, मुकेश अंबानी 26 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह देशातले सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून समोर आले आहेत. मंगळवारी केलेल्या एका अभ्यासाअंती हा आकडा समोर आला आहे. हुरन ग्लोबल रिच लिस्ट इंडियाच्या सर्वेक्षणानुसार, भारतात जवळपास 132 अब्जाधीश आहेत. ज्यांची एकूण मालमत्ता एक अब्ज डॉलरहून अधिक आहे. भारतात एकूण मिळून अब्जाधीशांकडे 392 अब्ज डॉलर इतकी संपत्ती असल्याची माहिती मिळाली आहे. सर्वेक्षणानुसार, नोटाबंदीनंतर अब्जाधीशांची संख्या घटली असली तरी त्यांच्या एकूण संपत्ती गेल्या वर्षीच्या तुलनेत 16 टक्क्यांनी वाढ झाली आहे.या अभ्यासानुसार, 132 अब्जाधीशांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानीचं नवा सर्वात वर आहे. मुकेश अंबानी यांच्याकडे 1 लाख 75 हजार 400 कोटी(26 अब्ज डॉलर) इतकी असल्याचं उघड झालं आहे. सर्वेक्षणात मुकेश अंबानींच्या जिओचाही उल्लेख करण्यात आला आहे. ज्यामुळे आयडिया, एअरटेल सारख्या कंपन्यांना नुकसान सोसावं लागण्याचं म्हटलं आहे. पहिल्या 10 अब्जाधीशांमध्ये अंबानीनंतर 1 लाख 1 हजार कोटी रुपयां(14 अब्ज डॉलर)च्या संपत्तीसह एसपी हिंदुजा आणि कुटुंबीयांनी दुसरं स्थान पटकावलं आहे. तर 99 हजार कोटी रुपयां(14 अब्ज डॉलर)च्या संपत्तीसह दिलीप सांघवी तिस-या स्थानी आहेत. मात्र त्यांच्या संपत्तीत 22 टक्के घसरण झाली आहे. 12 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह पालनजी मिस्त्री चौथ्या स्थानी, लक्ष्मी निवास मित्तल (12 अब्ज डॉलर) पाचव्या स्थानी, 12 अब्ज डॉलरसह शिव नादर सहाव्या स्थानी, 11 अब्ज डॉलरसह सायरस पुनावाला सातव्या स्थानी, 9.7 अब्ज डॉलरसह अजीम प्रेमजी आठव्या स्थानी, तर 7.2 अब्ज डॉलरसह उदय कोटक नवव्या स्थानी विराजमान झाले आहेत. तसेच डेविड रबेन आणि सायमन रबेन हे 6.7 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह दहाव्या स्थानी पोहोचले आहेत.
नोटाबंदीमुळे घटली अब्जाधीशांची संख्या, मुकेश अंबानी सर्वात श्रीमंत
By admin | Published: March 07, 2017 9:48 PM