नवी दिल्ली, दि. 1 - देशातले दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी हे आशियातील दुसरे सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणून समोर आले आहेत. मुकेश अंबानींनी संपत्तीच्या बाबतीत चीनचे व्यावसायिक ली का शिंग यांना मागे टाकलं आहे. ब्लूमबर्ग इंडेक्सच्या नुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत यंदाच्या वर्षात 12.1 अब्ज डॉलर एवढी वाढ झाली आहे. रिलायन्सच्या शेअर्सनं उसळी घेतल्यानंतर मुकेश अंबानींच्या नावे हा नवा रेकॉर्ड झालाय. आता मुकेश अंबानींची एकूण संपत्ती 34.8 अब्ज डॉलर झाली आहे. तर चीनचे व्यावसायिक ली का शिंग यांची एकूण संपत्ती 33.3 अब्ज डॉलर एवढी आहे. गेल्या एका वर्षात ली का शिंग यांच्या संपत्तीत फक्त 4.85 अब्ज डॉलरची भर पडली आहे. गेल्या महिन्यात रिलायन्सनं 1500 रुपयांच्या फोनच्या लाँचिंगची घोषणा केल्यानंतर रिलायन्सचा शेअर बाजारातील स्तर उंचावला आहे. 'अलिबाबा'चे फाऊंडर आणि सीईओ जॅक मा हे आशियातील पहिल्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत.
रिपोर्टनुसार, जिओमुळे कंपनीचे कर्ज 15 वर्षांतील सर्वोच्च पातळीवर पोहोचलं आहे. मुकेश अंबानींनी जिओसाठी आतापर्यंत 31 बिलियन डॉलरची गुंतवणूक केली आहे. कंपनीला 90 टक्के कमाई ही पेट्रोकेमिकल, रिफायनिंगमधून होते. त्याच्यासोबतच रिटेल, मीडिया आणि नैसर्गिक गॅसच्या मायनिंगमधूनही पैसा मिळतो. 21 जुलै रोजी झालेल्या एका बैठकीत अंबानींनी जिओला संपत्तीतील दागिना अशी उपमा दिली होती. तसेच येत्या काळात जिओ देशातील सर्वात मोठा डेटा सुविधा पुरवठादार, उत्पादने आणि अॅप्लिकेशनचा प्लॅटफॉर्म बनेल. जिओनं बाजारात आल्यानंतर निव्वळ नऊ महिन्यांत 11 कोटी 73 लाख यूझर्स मिळवले होते. त्यानंतर जिओ ही देशातील चौथी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी म्हणून समोर आली होती. ब्लूमबर्गच्या रिपोर्टमधून याचा खुलासा झाला आहे. कंपनीनं लाँच करणार असणा-या जिओ फोनमध्ये 22 भाषांचा समावेश असणार आहे.