- सोपान पांढरीपांडेनागपूर : सीबीआय आणि ईडीला पीटर व इंद्राणी मुखर्जी या दाम्पत्याने दिलेल्या जबाबामुळे माजी अर्थमंत्री पी. चिदम्बरम व त्यांचे पुत्र कार्ती अडचणीत आले आहेत. आयएनएक्स मीडिया प्रकरण आयएनएक्स मीडिया ही पीटर व इंद्राणी मुखर्जी यांची कंपनी असून ती टीव्ही चॅनल्सचे संचालन करण्यासाठी २००६ मध्ये स्थापन करण्यात आली होती. या कंपनीने २००७ मध्ये मॉरिशसच्या तीन कंपन्यांकडून विदेशी भांडवल उभारण्यासाठी फॉरेन एक्स्चेंज प्रमोशन बोर्डाला परवानगी मागितली. तसेच आयएनएक्स न्यूज या सहयोगी कंपनीलाही विदेशी भांडवलाची परवानगी द्यावी, अशी विनंती करण्यात आली होती.दोनच महिन्यांत एफआयपीबीने आयएनएक्स मीडियाला ४.६२ कोटी विदेशी भांडवल आणण्याची परवानगी दिली. परंतु आयएनएक्स न्यूजचा अर्ज नामंजूर केला. या परवानगीचा दुरुपयोग करून, आयएनएक्स मीडियाने ४.६२ कोटींऐवजी ३०५ कोटी रुपयांचे भांडवल मॉरिशसमधून आयएनएक्स व आयएनएक्स न्यूज या कंपन्यांमध्ये आणले. यासाठी आयएनएक्सने आॅगस्ट २००७ ते मे २००८ या काळात आपला १० रुपयांचा शेअर ८१० रुपयांना मॉरिशसच्या कंपन्यांना विकला, असे प्राप्तिकर खात्याच्या चौकशीत समोर आले आहे.इंद्राणी मुखर्जीने पहिल्या पतीपासून झालेली मुलगी शीना बोरा हिचा खून केल्याचे २०१४ मध्ये उघड झाल्याने तिला अटक झाली. पीटरचाही खुनात सहभाग असल्याचे उघड झाल्याने त्यालाही अटक झाली. गेल्या चार वर्षांपासून मुखर्जी दाम्पत्य जेलमध्ये आहे.या प्रकरणात ईडी व सीबीआयने चौकशी केली असता पीटर व इंद्राणी मुखर्जी यांचेही जबाब २०१८ मध्ये नोंदविण्यात आले.आयएनएक्स मीडियाने ४.६२ कोटींऐवजी ३०५ कोटी विदेशी भांडवल उभारल्याचे त्या दोघांनी मान्य केले. हा गैरप्रकार नियमित करण्यासाठी आपण कार्ती यांच्याशी १० लाख डॉलर्स देण्याचा सौदा केला आणि त्यापैकी ७ लाख डॉलर्स अॅडव्हान्टेज स्ट्रॅटेजिक कन्स्लटंटच्या विदेशी उपकंपन्याना दिले, असा जबाब दिला.या जबाबावरून ईडीने आयएनएक्स मीडिया प्रकरणात मे २०१७ मध्ये पीटर व इंद्राणी मुखर्जी आणि चिदम्बरम व कार्ती यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला. मग सीबीआयनेही त्यांच्या विशेष कोर्टात २०१७ मध्ये एफआयआर दाखल केला. या प्रकरणात इंद्राणी मुखर्जीने माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज केला आहे. चिदम्बरम व कार्ती या पिता-पुत्रांनी हे आरोप नाकारले आहेत, हे विशेष. चिदम्बरम यांना बुधवारी अटक झाल्यानंतर आता कार्ती यांचा जामीन रद्द होतो काय याबद्दल औत्सुक्य आहे.
मुखर्जी दाम्पत्यामुळे पी. चिदम्बरम यांची चौकशी; आयएनएक्स मीडियाने उभारले ४.६२ ऐवजी ३०५ कोटींचे भांडवल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2019 2:11 AM