शिलॉंग: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) दिल्ली दौऱ्यावर असताना मेघालय काँग्रेसमध्ये मोठा भुकंप झाला. काँग्रेसच्या मेघालयमधील १७ पैकी १२ आमदारांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामध्ये माजी मुख्यमंत्री मुकुल संगमा यांचाही समावेश आहे. या पक्ष प्रवेशानंतर मुकुल संगमा (mukul sangama) यांनी प्रतिक्रिया दिली असून, विरोधक म्हणून काँग्रेस अपयशी ठरला असून, यासंदर्भात प्रशांत किशोर यांच्याशीही चर्चा करण्यात आली होती. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही, असा गौप्यस्फोट मुकुल संगमा यांनी केला आहे.
ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर काँग्रेस पक्ष का सोडला, याबाबत अनेक खुलासे मुकुल संगमा यांनी केले. तसेच काही गौप्यस्फोटही केले आहेत. काँग्रेस पक्ष जिंकण्याच्या उद्देशाने निवडणुकीच्या रिंगणात उतरत नाही. काँग्रेस पक्ष अनेक राज्यात कमकुवत झाला असून, पुन्हा उभारी घेण्यासाठी त्यांच्याकडे कोणतीही ठोस योजना नाही, अशी टीका संगमा यांनी केली.
प्रशांत किशोर यांच्याशी अनेकदा चर्चा केल्या
काँग्रेस पक्षातीत अनेक ज्येष्ठ नेत्यांनी नेतृत्वाशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र काही फायदा झाला नाही. मीही अनेकदा एकामागून एक अनेक प्रयत्न केले. तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्याशी अनेकदा चर्चा केल्या. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही. आम्ही आमच्या बाजूने थोडा अभ्यास करुन इतर कोणासोबत जाणे शक्य आहे का, याची पडताळणी केली. नंतर प्रशांत किशोर यांनी समोर असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या पर्यायाकडे पाहिले पाहिजे असे सुचवले, असे संगमा यांनी सांगितले.
दरम्यान, आपली निष्ठा बदलण्याच्या निर्णयाचे मूळ हे अधिकाधिक बळकट होणाऱ्या भाजपाशी लढा देण्यातील काँग्रेसच्या अपयशात असल्याचे मुकुल संगमा यांनी नमूद केले. सन २०१० ते २०१८ या कालावधीत मुकुल संगमा मेघालयचे मुख्यमंत्री होते. यामुळे ईशान्य भारतातील मेघालयमध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये घाऊक प्रमाणात झालेला पक्षप्रवेश हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.