लखनऊ - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उत्तर प्रदेश सरकारने नोटिसा बजावल्यानंतर समाजवादी पक्षाचे नेते व माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव व अखिलेश यादव यांनी आपल्या ताब्यातील सरकारी बंगल्यांच्या किल्ल्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांकडे सुपुर्द केल्या.आता अतिशय आजारी असलेले नारायण दत्त तिवारी यांनी आपला बंगला रिकामा केलेला नाही. आपले पती मरणासन्न स्थितीत आहेत, असे त्यांच्या पत्नी उज्ज्वला यांनी सरकारला कळविले आहे. त्यामुळे आपणास बंगला रिकामा करण्यास अवधी मिळावा, अशी त्यांची विनंती आहे. मायावती यांच्याकडे दोन बंगले होते. त्यापैकी एक त्यांनी सरकारच्या ताब्यात दिला आहे. दुसºया सरकारी बंगल्यामध्ये बहुजन समाज पार्टीचे संस्थापक कांशीराम यांचे स्मारक बनवण्यात आले आहे. तो रिकामा करावा, अशी नोटीस बजावूनही त्यांनी तो रिकामा केलेला नाही. याखेरीज केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, राजस्थानचे राज्यपाल कल्याण सिंह यांनाही माजी मुख्यमंत्री म्हणून मिळालेले सरकारी बंगले रिकामे करण्याच्या नोटिसा सरकारने बजावल्या होत्या. त्यांनी निवासस्थाने रिकामी केली आहेत. माजी मुख्यमंत्री राम नरेश यादव यांनीही बंगला न्यायालयाच्या निकालाआधीच रिकामा करून सरकारच्या ताब्यात दिला. (वृत्तसंस्था)
मुलायम, अखिलेश यांनी बंगले दिले सरकारच्या ताब्यामध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 03:40 IST