मैनपुरी - मुलायम सिंह यांनी समाजवादी पार्टीच्या झेंड्याखाली उत्तर प्रदेशातील सर्व समाजाच्या लोकांना पक्षाशी जोडलं आहे यात काही शंका नाही. मुलायम सिंह हे पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखे खोट्या मागासवर्गीय जातींमधून येत नाही. मुलायम सिंह जन्मजात मागासवर्गीय नेते आहे असं सांगत मायावती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे. उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथे जाहीर सभेत त्या बोलत होत्या.
यावेळी बोलताना मायावती म्हणाल्या की, देशहितासाठी कधीकधी कठीण निर्णय घ्यावे लागतात. या निर्णयामुळे देशाच्या जनतेचं भलं होणार आहे. देशात सध्या जी परिस्थिती ती बदलायची असेल तर युपीमध्ये सपा-बसपाने एकत्र यावं. यासाठी हा निर्णय घेतल्याचं मायावती यांनी सांगितले.
उत्तर प्रदेशात 24 वर्षानंतर समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह आणि बसपाच्या नेत्या मायावती एकाच व्यासपीठावर आल्या. मैनपुरीमध्ये सपा-बसपा या दोन्ही पक्षांची संयुक्त सभा घेत मायावती यांनी मुलायम सिंह यांचा प्रचार केला. यावेळी बोलताना मायावती म्हणाल्या की, मुलायम सिंह हे खरे मागासवर्गीय नेते आहेत. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या खोट्या मागासवर्गीय समाजातून आले नाहीत. त्यामुळे मुलायम सिंह यांना भरघोस मतांनी निवडून द्यावं असं आवाहन मायावती यांनी उपस्थित जनसमुदायाला केलं.
अकलूज येथे काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘चौकीदार चोर है’ या मोहीमेवर टीका करताना काही व्यक्ती बोलत आहेत की, ज्यांचे आडनाव मोदी ते सर्व जण चोर का आहेत. मी खालच्या जातीचा असल्याने अनेकदा माझ्यावर टीका केली. आता तर त्यांनी आणखी पाऊल पुढे टाकले आहे. ते आता एका समाजालाच शिव्या देत आहेत. मला कितीही शिव्या द्या, मी ते सहन करु शकतो. पण देशातील आदिवासी, शोषित आणि मागास वर्गाला चोर म्हटल्यास मी ते सहन करणार नाही असा इशारा विरोधकांना दिला होता. पंतप्रधानांच्या या विधानावर मायावती यांनी भाष्य केलं.
याच सभेमध्ये मुलायम सिंह यांनी मायावतींचे आभार मानत सांगितले की, सपा-बसपा उत्तर प्रदेशात मोठ्या मतांनी जिंकून येईल. आज मायावती आमच्या व्यासपीठावर आल्या. त्यांचे आम्ही स्वागत करतो. मायावती यांचा आदर नेहमीच राखला जाईल. जेव्हा वेळ पडेल तेव्हा मायावती यांनी आम्हाला साथ दिली आहे. मायावती यांचे येण्याने आम्हाला आनंद झाला आहे. त्यामुळे आम्ही निवडून येऊ असा विश्वास मुलायम सिंह यांनी व्यक्त केला.