उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, देशाचे माजी संरक्षण मंत्री मुलायम सिंह यादव यांनी आज अखेरचा श्वास घेतला. शिक्षक असलेले मुलायम युपीच्या राजकारणाचे सर कधी झाले कोणालाच कळले नाही. 1967 मध्ये ते सोशलिस्ट पार्टीच्या तिकिटावर सर्वात कमी वयात आमदार झाले आणि राजकारणात आले.
दहा वेळा आमदार, सात वेळा खासदारकी भूषविणारे मुलायम किती कमी वयात राजकारणात आले असतील याचा विचार करा. हेच मुलायम १ जून १९९६ ते १९ मार्च १९९८ या काळात देशाचे संरक्षण मंत्री देखील होते. राजकीय अस्थिरतेचा काळ होता, याचवेळी मुलायम यांनी देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीद आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी खूप महत्वाचा निर्णय घेतला. तुम्ही जुन्या सिनेमांमध्ये पाहिले असेल, सैनिक जेव्हा देशाच्या सीमेवर शहीद व्हायचा तेव्हा तो संदेश घेऊन सैन्याचा अधिकारी शहीदाच्या घरी दारात जायचा. त्या शहीदाच्या कुटुंबाला सैनिकाची टोपी, सैन्याचा ड्रेस दिला जायचा. आज शहीद सैनिकांचे पार्थिव त्यांच्या घरापर्यंत पोहोचविले जाते. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातात. हा निर्णय मुलायम सिहांनी घेतला होता.
मुलायम सिंहांनी संरक्षण मंत्रीपद हाती घेताच आधी सैनिकांसाठीचा हा कायदा बदलला. एखाद्या गावातला सैनिक शहीद झाला तर त्याच्या घरी केवळ सैन्याचे अधिकारी नाहीत, तर जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षकांना देखील जाण्याचा नियम केला. यामुळे आज आपल्या जवानांना सन्मानाने अलविदा केले जाते. याच मुलायम सिहांनी सुखोई ३० लढाऊ विमानांची डील केली होती. मुलायमसिंग यादव 1989 ते 1991, 1993 ते 1995 आणि 2003 ते 2007 असे तीन वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. 1996 ते 1998 या काळात ते देशाचे संरक्षण मंत्री होते. मुलायम सिंहांना गृह मंत्री पद हवे होते. परंतू, त्यांना संरक्षण मंत्री पद देण्यात आले. त्याचेही त्यांनी सोने केले.