सैफई (इटवाह) : समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा मुलायमसिंग यादव यांचा नातू आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांच्या कन्येच्या विवाहाचे पडघम वाजू लागले असून शनिवारी येथे आयोजित साक्षगंध समारंभाला खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावून सर्वांनाच आश्चर्यचकित केले. मोदी यांच्या साक्षीने दोन्ही यादवांमधील राजकीय नाते आता अधिक दृढ झाले आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारच्या राजकारणातील दिग्गज नेते या समारंभाला आवर्जून उपस्थित होते. सकाळी ११.४५ वाजता मोदी यांचे राज्यपाल राम नाईक यांच्यासह आगमन झाले. लालूप्रसाद आणि मुलायमसिंग यांनी त्यांचे स्वागत केले. मुलायमसिंग यांचे नातू आणि मैनपुरीचे खासदार तेजप्रताप यादव आणि लालूप्रसाद यांची कनिष्ठ कन्या राजलक्ष्मी याच महिन्यात २६ तारखेला विवाहबद्ध होत आहेत. या समारंभाला पंतप्रधान मोदी उपस्थित राहिल्याने भारतीय जनता पार्टी आणि सपा निकट भविष्यात जवळ येणार काय, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असतानाच खा. तेजप्रताप यांनी मात्र पंतप्रधानांच्या या भेटीकडे राजकीय दृष्टिकोनातून बघितले जाऊ नये, असे स्पष्ट केले आहे. (वृत्तसंस्था)आमच्या आमंत्रणाचा स्वीकार करून आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी पंतप्रधान येथे आले त्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभारी आहोत. त्यांना असलेला आमचा विरोध हा मुद्यांवर आधारित आहे, वैयक्तिक नाही, असेही ते म्हणाले. देशाच्या राजकारणात नवी समीकरणे स्थापित करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणारे जनता परिवारातील नेतेही या भव्यदिव्य समारंभास उपस्थित होते. मुलायमसिंग आणि लालूप्रसाद या दोघांनीही भूतकाळात मोदींवर अनेकदा कठोर प्रहार केले आहेत. परंतु साक्षगंध समारंभात मात्र हे तिघेही अत्यंत प्रफुल्लित वातावरणात एकमेकांसोबत हस्तांदोलन करीत छायाचित्रे काढून घेताना दृष्टीस पडले. मंचावर लालूप्रसाद आणि मुलायमसिंग यांच्या मध्ये बसलेले नरेंद्र मोदी यांनी यादव कुटुंबीयांसोबत आणि विशेषत: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या मुलांना मांडीवर घेऊन आनंदाने छायाचित्रे काढून घेतली. ही मुले पंतप्रधानांच्या मांडीवर जाऊन बसली तेव्हा त्यांनी आपल्या शैलीत कान पकडून त्यांचा लोभ केला.तब्बल पाऊण तास ते यादव कुटुंबीयांसमवेत समारंभात होते. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांची उपस्थितीही या समारंभाचे आकर्षण ठरली. नंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंगही या समारंभात सहभागी झाले. याशिवाय सपापासून विभक्त झालेले माजी खासदार अमरसिंग, संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री बाबुलाल गौर, माजी केंद्रीय मंत्री रघुवंश प्रसाद, माजी मुख्यमंत्री नारायणदत्त तिवारी, भाजपाचे खा. साक्षी महाराज आदींचा उपस्थितांमध्ये समावेश होता. दीड लाख लोकांना या समारंभासाठी आमंत्रित करण्यात आले होते. सपा प्रमुखांचे घनिष्ट सहकारी आणि पक्षाचा मुस्लिम चेहरा मानले जाणारे राज्याचे नगर विकास मंत्री आझम खान यांची अनुपस्थिती अनेकांना खटकली. पण दुपारनंतर तेही पोहोचले. कोट(वृत्तसंस्था)४‘माझ्या मुलीचे लग्न साऱ्या देशात चर्चेचा विषय झाला याचा आनंद आहे. मुलायमसिंग यादव यांनी या लग्नासाठी आमच्याकडून हुंड्यात एकही पैसा मागितला नाही. कारण आमची मने जुळली आहेत.’लालूप्रसाद यादव, राजद नेते
मुलायमसिंगांच्या नातवाच्या साक्षगंध समारंभात मोदी!
By admin | Published: February 22, 2015 12:05 AM