- मीना कमल, लखनौ
उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीतील अंतर्गत कलहाने राजकीय वातावरण ढवळून निघालेले असतानाच, पक्षप्रमुख मुलायमसिंह यादव हे पुत्र अखिलेश यांचे बंड मोडून काढण्यास महाआघाडीची जुळवाजुळव करत असल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेस, राष्ट्रीय लोकदल, जनता दल (यू) व छोट्या पक्षांना सोबत घेण्याचा विचार केला जात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारमधील आघाडीच्या धर्तीवरच ही महाआघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न आहे. मुलायमसिंह यांनी राष्ट्रीय लोकदलाचे नेते अजित सिंग यांच्याशी तर शिवपाल यांनी जद (यू) च्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क केल्याचे वृत्त आहे. शिवपाल यांनी तर असे स्पष्टपणे म्हटले आहे की, नेताजींनी (मुलायमसिंह) आता मुख्यमंत्री व्हायलाच हवे. त्याशिवाय ना पक्ष ना सरकार वाचू शकेल. आगामी निवडणूक मुलायमसिंह यांच्या नेतृत्वात लढविली जाईल. मुलायम सिंह (७७) हे मुख्यमंत्री म्हणून परत सक्रिय होऊ शकतात, असेही शिवपाल यांनी सांगितले.अखिलेश आणि शिवपाल हे दोन सत्ता केंद्र सोबत घेऊन चालणे आता अवघड झाले आहे. जुन्या समाजवादी नेत्यांच्या म्हणण्यानुसार मुलायम सक्रिय झाले तर जुना मतदार पुन्हा पक्षाकडे येईल. अखिलेश वेगळे झाले किंवा महाआघाडी झाली, तरी आपसूकच आपल्याला त्याचा फायदा होईल, भाजपाला वाटते. अखिलेश यांनी निवडणुकीत ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतली असल्याचे समजते. ‘मेरा परिवार उत्तर प्रदेश है’ ही घोषणा वापरून ते सामोरे जाणार असल्याचे कळते. मुलायम यांच्या समर्थकांनी सांगितले की, अखिलेश यांनी मुलायम सिंह आणि शिवपाल यांच्या फोटोशिवाय होर्डिंग, पोस्टर तयार केले आहेत.