Mumbai-Ahmedabad Bullet Train : मुंबई आणि अहमदाबाद या दोन शहरादरम्यान धावणाऱ्या बुलेट ट्रेनबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. या हाय-स्पीड बुलेट ट्रेनसाठी देशातील पहिली बॅलेस्टलेस ट्रॅक सिस्टिम बनवण्याचे काम प्रगतीपथावर आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विटरवर या प्रकल्पाचा एक व्हिडिओ शेअर केला असून, व्हिडिओद्वारे प्रकल्पाच्या कामाविषयी माहिती देण्यात आली आहे.
भारतात पहिल्यांदाच मुंबई-अहमदाबाद हायस्पीड बुलेट ट्रेनसाठी विशेष ट्रॅक सिस्टम तयार करण्यात येत आहे. याला बॅलेस्टलेस ट्रॅक सिस्टीम म्हणतात. या ट्रॅक सिस्टीममध्ये प्रामुख्याने 4 भाग आहेत. आरसी ट्रॅक बेड, सिमेंट मोर्टार, प्रीकास्ट ट्रॅक स्लॅब आणि फास्टनर्ससह रेल. दोन शहरांमध्ये प्री-कास्ट आरसी ट्रॅक स्लॅब तयार केले जात आहेत. गुजरातच्या आनंद आणि किममध्ये हे काम सुरू आहे. हे ट्रॅक बांधण्याचे काम वेगाने सुरू आहे. ही अनोखी ट्रॅक सिस्टीम उत्कृष्ट अभियांत्रिकीचे आणि मेक इन इंडियाचे उत्तम उदाहरण आहे.
वाऱ्याचा वेग मोजला जाणार...या वेगवान ट्रेनचे जोरदार वारा किंवा वादळामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी विशेष पावले उचलली जात आहेत. यासाठी 508 किलोमीटरच्या मार्गावर 14 ठिकाणी वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी ॲनिमोमीटर बसवण्यात येणार आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने सांगितले की, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉर देशाच्या पश्चिम भागातील किनारी भागातून जाईल, जिथे वाऱ्याचा वेग काही विशिष्ट भागात केंद्रित आहे. या जोरदार वाऱ्यांमुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. यासाठी 14 ठिकाणी ॲनिमोमीटर बसवण्यासाठी बसवण्यात येतील.