नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींचं(PM Narendra Modi) ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या बुलेट ट्रेनबाबत महत्त्वाची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी दिली आहे. देशातील पहिली बुलेट ट्रेन मुंबईहून अहमदाबादपर्यंत धावणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून या बुलेट ट्रेनची चर्चा लोकांमध्ये आहेत. परंतु याबाबत काहीच स्पष्ट नाही. मात्र आता रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुजरातच्या सूरतहून बिलीमोरा येथे पहिली बुलेट ट्रेन २०२६ मध्ये सुरू होईल अशी आशा व्यक्त केली आहे.
बिलिमोरा हे दक्षिण गुजरातच्या नवसारी जिल्ह्यात आहे. सध्या या मार्गावर वेगाने काम सुरू आहे. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी रेल्वेमंत्री सुरत येथे होते. त्यावेळी ते म्हणाले की, अहमदाबाद ते मुंबई दरम्यान बुलेट ट्रेन धावण्यासाठी पायाभूत सुविधांच्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. २०२६ मध्ये सुरत ते बिलीमोरा दरम्यान पहिली बुलेट ट्रेन चालवण्याचे आमचे ध्येय आहे. त्याची प्रगती चांगली आहे आणि आम्हाला आशा आहे की आम्ही हे लक्ष्य साध्य करू शकू असं त्यांनी म्हटलं आहे.
मुंबई ते अहमदाबाद दरम्यान ताशी ३२० किमी वेगाने बुलेट ट्रेन चालवण्याचा प्रस्ताव आहे. दोन शहरांमधील एकूण अंतर ५०८ किमी आहे आणि त्यात १२ स्थानके असतील. या ट्रेनमुळे दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ अवघा ३ तास होणार आहे. सध्या या प्रवासासाठी सहा तास लागतात. या प्रकल्पाची एकूण अंदाजे किंमत १.१ लाख कोटी रुपये आहे. त्यापैकी ८१ टक्के निधी जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी (JICA) कडून दिला जात आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या ६१ किमीच्या मार्गावर खांब उभारण्यात आले असून १५० किमीच्या मार्गावर काम सुरू असल्याचा दावा वैष्णव यांनी केला.
महाराष्ट्रात लागला ब्रेकगुजरातमध्ये बुलेट ट्रेनचं काम प्रगतीपथावर असलं तरी महाराष्ट्रातील बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाबद्दल विचारले असता, भूसंपादनाच्या समस्येमुळे तेथे काम संथगतीने सुरू असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले. महाराष्ट्र सरकारने सहकार्याच्या भावनेने या प्रकल्पात काम करावे, हा राष्ट्रीय प्रकल्प असून त्यात कोणतेही राजकारण नसावे. आपण या प्रकल्पावर एकत्र काम करून एक उदाहरण ठेवले पाहिजे, महाराष्ट्र विभागात त्याची प्रगती संथ आहे. तेथे कामाला गती येईल, अशी आशा आहे असं रेल्वेमंत्र्यांनी सांगितले.