ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २० - मुंबईवर २६/ ११ ला झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि 'लष्कर-ए-तोयबा'चा दहशतवादी झकी उर रेहमान लख्वी याचा भाचा जम्मू-काश्मिरमधील एन्काऊंटरमध्ये ठार झाला आहे. उत्तर काश्मिरमधील बंदीपोरा येथे झालेल्या चकमकीत लष्कराच्या जवानांनी लख्वीचा भाचा, अबू मुसैबला यमसदनी धाडले. अबू हा 'लष्कर ए तोयबा'चा कमांडर होता. ऑगस्ट २०१५ पासून बंदीपोरा भागात सक्रीय असलेला अबू अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होता. गेल्या वर्षी १५ ऑगस्ट रोजी, स्वातंत्र्य दिनी श्रीनगरमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या कॅम्पवर करण्यात आलेल्या आत्मघाती हल्ल्यातही अबू मुसैबचाच हात होता.
गेल्या काही वर्षांपासून काश्मीर खो-यात 'लष्कर-ए-तोयबा'च्या कारवाया वाढल्या होत्या, त्यामध्ये अबूची प्रमुख भूमिका होती. तो 'लष्कर'चा कमांडर होता आणि थेट लख्वीकडूनच कमांड घ्यायचा. दहशतवाद्यांसाठी फंड जमा करणे तसेच शस्त्रास्त्रं आणि दारूगोळ्याची व्यवस्था करणे आणि हिंसक आंदोलनांना चिथावणी देणे, अशी अनेक कामं तो करत होता.
अबूच्या एन्काऊंटरबद्दल पोलिस प्रवक्त्यांनी माहिती दिली. ‘हाजीनपासून ३२ किलोमीटर अंतरावर एक दहशतवादी लपून बसल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. त्यानंतर राज्य राखीव पोलीस दलासह राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांनी संपूर्ण परिसर ताब्यात घेून शोधमोहमि सुरू केली. त्यादरम्यान आमच्यावर गोळीबार झाल्याने चकमक सुरू झाली. ब-याच काळानंतर त्या दहशतवाद्याला ठार करण्यात आम्हाला यश मिळाले. त्या दहशतवाद्याची ओळख पटली असून त्याचे मुसैब आहे. तो पाकिस्तानचा रहिवासी आहे,’ अशी माहितीही पोलिसांनी दिली.