मुंबई: कोरोना विषाणूने कंबरडे मोडले असतानाच दुसरीकडे आश्चर्यचकित करणारा एक अहवाल नुकताच समोर आला आहे. त्यानुसार देशात सर्वाधिक श्रीमंत कुटुंबे देशाची आर्थिक राजधानी आणि मायानगरी अशी ओळख असलेल्या मुंबईत आणि महाराष्ट्रात वास्तव्य करीत असून, देशाची राजधानी दिल्ली मात्र कुबेरांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. हारून इंडिया वेल्थ रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला असून, यातील प्रमुख मुद्दे विचारात घेता देशभरात ४.१२ लाख कोट्यधीश आहेत. मुंबई शहरात वास्तव्य करणाऱ्या श्रीमंतांची संख्या अधिक असून, देशातील कोट्यधीश गुंतवणुकीसाठी गृहनिर्माण क्षेत्र आणि शेअर मार्केटला प्राधान्य देत आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ही दोन्ही क्षेत्रे गुंतवणुकीसाठी सुरक्षित मानली जात नसली तरीही येथे गुंतवणुकीस प्राधान्य दिले जात आहे. देशभरातील ७०.३ टक्के श्रीमंत दहा राज्यांमध्ये वास्तव्यास आहेत. श्रीमंतांच्या यादीत मुंबई आणि दिल्ली ही दोन शहरे एका खालोखाल आहेत. राज्याचा विचार करता ५६ हजार कोट्यधीशांमुळे महाराष्ट्र पहिल्या स्थानावर आहे. उत्तर प्रदेश दुसऱ्या स्थानावर असून, येथील श्रीमंतांची संख्या ३६ हजार आहे. तामिळनाडू तिसऱ्या स्थानावर आहे; येथील श्रीमंतांचा आकडा ३५ हजार आहे. कर्नाटक चौथ्या स्थानावर असून, येथील श्रीमंतांचा आकडा ३३ हजार आहे. तर गुजरात पाचवा स्थानी असून, येथे २९ हजार श्रीमंत आहेत. आर्थिक विकास दर हा मुद्दा लक्षात घेता विविध राज्ये आणि शहरांतील श्रीमंत हे आर्थिक विकास दरात योगदान देत आहेत. आकडेवारीनुसार, मुंबईमधील १६ हजार ९३३ श्रीमंत कुटुंबे देशाच्या आर्थिक विकास दरात ६.१६ टक्के एवढा वाटा उचलत आहेत. दिल्ली येथील १६ हजार कुटुंबांचा हाच वाटा ४.९४ एवढा आहे. याच श्रीमंत वर्गामुळे ब्रँडेड साहित्याचा बाजार तेजीत आहे. श्रीमंतांकडील वाहनांच्या ताफ्याचा विचार केल्यास मर्सिडीज त्यांची आवडती कार असून, याखालोखाल बीएमडब्ल्यू आणि जग्वार या दोन गाड्यांना श्रीमंतांची पसंती मिळत आहे. स्पोर्ट्स कार खरेदी करण्याकडे त्यांचा अधिक कल आहे. रोलेक्स हे श्रीमंतांचे आवडते घड्याळ असून, सोन्याचा विचार करता तनिष्क यास श्रीमंत अधिक प्राधान्य देत आहेत. त्यांच्या आवडत्या हॉटेलांच्या यादीत ताज पहिल्या स्थानी आहे. हा श्रीमंत वर्ग एचडीएफसी, आयसीआयसीआय या दोन बँकांकडे आकर्षित होत असून विम्याचा विचार करता त्यांच्याकडून एलआयसी या कंपनीस प्राधान्य दिले जात आहे. अहवालानुसार इमिरात, सिंगापूर आणि एतीहात या विमान कंपन्यांना ते प्रवासासाठी जास्त प्राधान्य देतात.
राज्यांत महाराष्ट्र पहिल्या स्थानीश्रीमंतांच्या यादीत शहरांत मुंबई तर राज्यांत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. मुंबईत १६ हजार ९३३ श्रीमंत कुटुंबे असून ५६ हजार कोट्यधीशांमुळे श्रीमंत कुटुंबांमध्ये देशातील सर्व राज्यांत महाराष्ट्र पहिल्या स्थानावर आहे.
देशाच्या आर्थिक विकास दरात १६,९३३ मुंबईतील कुटुंबे ६.१६ टक्के वाटा उचलत आहेत. १६,००० दिल्लीतील कुटुंबे ४.९४ टक्के वाटा उचलत आहे.