मुंबई- 30 जानेवारी 1948 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची दिल्लीमधील बिर्ला भवन येथे हत्या करण्यात आली. सायंप्रार्थनेला जाणाऱ्या महात्मा गांधीजींवरनथुराम गोडसेने तीन गोळ्या झाडल्या आणि त्यातच गांधीजींचे प्राण गेले. आज महात्मा गांधींच्या हत्येला 70 वर्षे होत आहेत. गांधीजींची हत्या दिल्लीमध्ये झाली असली तरीही या खटल्याचे संपूर्ण केंद्र मुंबईतच होते. मुंबई पोलिसांच्या इतिहासावर विशेष संशोधन करणाऱ्या दीपक राव यांनी गांधीहत्येच्या खटल्याबाबत काही विशेष बाबी लोकमतला सांगितल्या. महात्मा गांधींच्या हत्येमध्ये सहभागी असणारे सर्व मुख्य आरोपी हे तत्कालीन मुंबई प्रांतातले होते. गांधीजींचा मारेकरी दस्तुरखुद्द नथुराम गोडसे, गोपाळ गोडसेसह इतर संशयितही तत्कालिन मुंबई प्रांतातील होते. त्यामुळे तपासाची सर्व सूत्रे येथूनच हलवली गेली. गांधी हत्येचा तपास मुंबई स्पेशल ब्रँचचे उपआयुक्त जे. डी. नगरवाला यांच्या नेतृत्त्वाखाली झाला होता.
(गांधीहत्या खटल्याचा तपास करणारे जे. डी. नगरवाला)नथुराम गोडसेला आणले मुंबईतजे. डी. नगरवाला आणि दीपक राव हे मुंबईत एकाच इमारतीत राहात होते तसेच नगरवाला यांच्याबरोबर दीपक राव यांच्या वडिलांनीही काम केले होते. नगरवाला यांचे पूर्ण नाव जमशेद दोराब नगरवाला असे होते. नगरवाला 1936 साली इम्पिरियल पोलीस सेवेमध्ये रुजू झाले. बलुचिस्तान आणि सिंध प्रांताच्या सीमेवर त्यांनी आपले कामकाज सुरु केले. नगरवाला यांना बॉक्सिंग आणि वेटलिफ्टिंगची विशेष आवड होती. सहा फूटांहून उंच अत्यंत उत्तम शरीरयष्टी असणारे नगरवाला हे उत्तम घोडेस्वार होते असेही राव सांगतात.
17 फेब्रुवारी 1948 रोजी नगरवाला यांच्याकडे गांधीहत्येचा तपास सोपविण्यात आला. 1 मे 1960 रोजी गुजरात राज्याचे पहिले आयजीपी म्हणून त्यांची नेमणूक झाली. निवृत्तीनंतर नगरवाला यांनी आपणच नथुराम गोडसेला मुंबईत आणण्याचा निर्णय घेतला होता असे राव यांना सांगितले होते. महात्मा गांधीजींच्या हत्येच्या खटल्याची त्यांनी बहुतांश सर्व माहिती मनोहर माळगांवकर यांना दिली होती. गांधीहत्येवर आधारीत आणि तपासाबद्दल सर्व माहिती देणारे माळगांवकरांचे 'मेन हू किल्ड गांधी' हे पुस्तक प्रसिद्ध आहे.
नथुराम गोडसेला दोन आठवडे मुंबईत कोणत्या इमारतीत ठेवले?नथुराम गोडसेने गांधीजींची हत्या केल्यानंतर संपूर्ण भारतामध्ये जनमानस संतापले होते. त्यामुळे नथुरामला मुंबईत आणल्यानंतर त्याला कोठडीत न ठेवता स्पेशल ब्रँचच्या एका मोठ्या खोलीत ठेवण्यात आले होते. या खोलीत दोन आठवडे त्याला ठेवण्यात आले होते. नगरवाला य़ांचे कार्यालयही तेथेच होते. आज येथे रेकॉर्ड विभाग आहे.