मुंबई : मुंबईतील डोंगरी भागात असलेल्या कौसरबाग इमारतीचा निम्मा भाग कोसळल्याची घटना मंगळवारी (16 जुलै) घडली. यामध्ये 40 ते 50 जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ, पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्यास सुरुवात करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डोंगरी इमारत दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे.
'डोंगरीतील इमारत दुर्घटना अत्यंत दु:खद आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसोबत माझ्या सहवेदना आहेत. जखमी झालेले लोक लवकर बरे होतील अशी मला आशा आहे. महाराष्ट्र सरकार, एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासन मदत आणि बचावकार्य करत आहे' असं ट्वीट पंतप्रधान मोदींनी केले आहे. आतापर्यंत या दुर्घटनेत चौघांचा मृत्यू तर 8 जण जखमी झाले आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त मंजुनाथ सिंगे यांनी दिली आहे.
साबिया निसार शेख (25), अब्दुल सत्तार कालू शेख (55), मुझ्झमील सलमानी (15), सायरा शेख (25) अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावं आहेत. तर फिरोज नाझिर सलमानी (45), आयशा शेख (3), सलमा शेख (55), अब्दुल रहमान (3), नावेद सलमानी (35), इम्रान हुसेन कल्वानिया (30), जावेद (30) आणि झिनत (30) अशी जखमींची नावं आहेत.
दुर्घटनास्थळी बचाव कार्य सुरू असताना एका चिमुकल्याला बाहेर काढण्यात आलं. चार मजली इमारतीचा भाग कोसळूनदेखील चिमुकला सुरक्षित असल्यानं उपस्थितांनी आश्चर्य व्यक्त केलं. दुर्घटनास्थळी अद्यापही अनेकजण अडकले असल्याची भीती व्यक्त होत आहे. कोसळलेली इमारत 100 वर्षे जुनी असल्याचं स्थानिकांनी सांगितलं. या इमारतीत 8 ते 10 कुटुंब वास्तव्यास होती.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी घटनास्थळी भेट दिली. यानंतर त्यांनी या दुर्घटनेचा सरकारच जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, "डोंगरी भागातील दुर्घटनेला राज्य सरकार जबाबदार आहे. दुर्घटनाग्रस्त इमारत पुनर्विकास यादीत होती मात्र त्यावर निर्णय घेतला गेला नाही. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कार्यकाळात इमारत पुनर्विकासाबाबतची एक बैठकही घेतली नाही. पुनर्विकासाच्या इमारतींबाबत सरकारचे धोरण हे उदासीन आहे. पुनर्विकासाबाबत मुख्यमंत्र्यांनी किती बैठका घेतल्या? राज्य सरकारच्या उदासीन धोरणामुळेच अशा इमारत दुर्घटना होत आहेत. राज्य सरकारचे पुनर्विकासाचे उदासीन धोरण, म्हाडा आणि मुंबई महापालिका दुर्घटनेला जबाबदार आहे."
डोंगरी येथील दुर्घटनाग्रस्त इमारत 100 वर्षे जुनी होती, धोकादायक इमारतीच्या यादीत या इमारतीचा समावेश नव्हता. पुनर्विकासासाठी इमारत विकासकाकडे दिली होती. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. या घटनेची सखोल चौकशी करुन योग्य ती कारवाई करु अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मुंबईतील दुर्घटनेबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले की, दुर्घटनाग्रस्त झालेली इमारत ही सुमारे 100 वर्षे जुनी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. म्हाडाच्या अखत्यारीत असलेली ही इमारत स्थानिक रहिवाशांनी पुर्नविकासासाठी बिल्डरला दिली होती. मात्र या इमारतीचा तत्काळ खाली करण्यात येणाऱ्या धोकादायक इमारतींमध्ये समावेश नव्हता. आता या इमारतीच्या दुरुस्तीचे काम बिल्डरने तातडीने सुरू केले होते की नाही याची चौकशी करण्यात येईल. मात्र सध्यातरी कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या रहिवाशांना बाहेर काढण्याचे काम प्राथमिकतेने करण्यात येईल.