जमशेदपूर : पहाटेच्या साखरझाेपेत असलेल्या रेल्वे प्रवाशांवर काळाने घाला घातला. हावड्याहून मुंबईला येणाऱ्या १२८१० हावडा-मुंबई मेलचे १८ डबे बडाबम्बू रेल्वेस्थानकाजवळ घसरले. या भीषण अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून, २० जण जखमी झाले आहेत. त्यांपैकी सहाजणांची प्रकृती गंभीर आहे.
पहाटे ३:४३ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. याच ठिकाणी एक मालगाडीदेखील रुळांवरून घसरली हाेती. मेलचे इंजिन मालगाडीला धडकल्यामुळे मेलचे डबे घसरले. जमशेदपूरपासून सुमारे ९० किलाेमीटर अंतरावर अपघाताचे ठिकाण आहे. अपघातात मरण पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाइकांना प्रत्येकी १० लाख तर गंभीर जखमींना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
ताशी १२० किमी वेग
हावड्याच्या दिशेने जाणाऱ्या रुळांवर एक मालगाडी घसरली हाेती. तिला मेलचे डबे धडकले. अपघात घडला त्यावेळी मेलचा वेग ताशी १२० किलाेमीटर हाेता. गाडी वेगाने असल्यामुळे जवळपास एक किलाेमीटर अंतरावरील रुळ उखडून गेले.
हलगर्जीपणा भाेवला?
३.३३ वाजता मालगाडीने बडाबम्बू स्थानक ओलांडले आणि २ किलाेमीटर अंतरावर ३.३९ वाजता मालगाडीचे काही डबे घसरले. याबाबत लाेकाेपायलटने नियंत्रण कक्षाला सूचना दिली. त्यानंतर ३.४५ वाजताच्या सुमारस वेगाने धावणारी मेल मालगाडीला धडकली. या सहा मिनिटांमध्ये पावले उचलण्यात आली असती, तर हा अपघात टळला असता.