ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 19 - मुंबईहून लंडनला जाणा-या जेट एअरवेजच्या विमानाचं जर्मनीच्या हवाई क्षेत्रात एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटल्यानं तात्काळ जर्मनीनं लढाऊ विमानांना पाठवलं. जर्मनीला या विमानाचं हायजॅक झाल्याची भीती वाटल्यानं त्यांनी सुरक्षिततेसाठी हे पाऊल उचललं आहे. जर्मनीनं हवाई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बोइंग-777 या विमानाच्या सुरक्षेखातर दोन लढाऊ विमानांना हवेत पाचारण केलं. त्यानंतर 300 प्रवासी असलेलं हे विमान लंडनमध्ये सुरक्षितरीत्या उतरलं आहे.फ्लाइट 9W-118 मुंबई-लंडन विमानाचं थोड्या वेळेसाठी जर्मनीत एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटला होता. त्यानंतर काही मिनिटांनी या विमानाशी संपर्क पुन्हा प्रस्थापित झाला. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव जर्मनीनं स्वतःच्या लढाऊ विमानांना पाठवलं. डीजीसीएसोबत सर्व अधिका-यांना याचा रिपोर्ट पाठवण्यात आला आहे. या विमानाच्या क्रू मेंबर्सला चौकशी पूर्ण होईपर्यंत कामावर न येण्यास सांगितलं आहे.एव्हिएशन हेरॉल्ड नावाच्या वेबसाइटवर या सर्व थरारनाट्याचा एक व्हिडीओ दाखवण्यात आला आहे. मात्र या व्हिडीओबाबत सत्येची खातरजमा होऊ शकली नाही. जेट एअरवेजनंही या व्हिडीओवर कोणताही आक्षेप घेतला नाही. या प्रकरणात विमानाच्या क्रू मेंबर्सला भारतीय हवाई सुरक्षा नियामक, नागरिक उड्डयन महानिर्देशालय(डीजीसीए)अंतर्गत चौकशी पूर्ण होईपर्यंत कामावर येण्यास मज्जाव केला आहे, अशी माहिती जेट एअरवेजनं दिली आहे.