बंगळुरू- कर्नाटकाच्या येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एच. डी. देवेगौडा यांचा जनता दल (एस) असदुद्दीन ओवैसी यांच्या पक्षाशी आघाडी करण्याची शक्यता आहे. परंतु अद्यापही या आघाडीबाबत तर्कवितर्कच लढवले जातायत. आघाडी झालीच तर असदुद्दीन ओवैसींचा पक्ष कर्नाटकात 40 जागांवर लढणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
परंतु जनता दला(एस)कडून अद्यापही आघाडी करण्यासंदर्भात काहीही संकेत मिळालेले नाहीत, अशी माहिती एमआयएमनं एका वृत्तवाहिनीला दिली आहे. त्यांनी आम्हाला राज्यसभा निवडणुकांपर्यंत थांबण्यास सांगितलं आहे. आघाडी झाल्यास 40 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा आमचा विचार आहे, असंही ओवैसी म्हणाले आहेत.
जनता दला(एस)नं आधीच बहुजन समाज पक्षाशी आघाडी केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मुस्लीम, दलित आणि वोक्कालिग मतदारांना चुचकारण्यासाठीच देवेगौडांचा पक्ष एमआयएमची आघाडी करण्याची शक्यता आहे. या आघाडीमुळे काँग्रेसच्या मतांवर प्रभाव पडणार आहे. त्यासाठीच राहुल गांधी आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गेल्या आठवड्यात स्वतःच्या पारंपरिक मतदारांना आकर्षित करण्यासाठी जनता दलावर टीकेची झोड उठवली होती.
हैदराबादेतल्या एमआयएम या पक्षानं गेल्या पाच वर्षांत तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातही पकड मजबूत करण्याचा प्रयत्न चालवला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातही एमआयएमनं काही जागांवर विजय मिळवला होता. त्यामुळेच इतर राज्यांतील मुस्लीमबहुल भागात प्राबल्य मिळवण्यासाठीही एमआयएम प्रयत्नशील आहे. निजामांनी राज्य केलेल्या तेलंगणा आणि आंध्र प्रदेशाबरोबरच हैदराबाद-कर्नाटक क्षेत्रावरही त्यांची नजर आहे.