पुणे : पुण्यासह राज्यातील प्रमुख शहरांमधून कैलास मानसरोवरासह इतर पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी गेलेले पर्यटक तीन दिवसांपासून चीनच्या सीमेवर अडकून पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ट्रॅव्हल्स कंपनीच्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे पर्यटकांना त्रास सहन करावा लागला. मात्र, मंगळवारी या पर्यटकांचा पुढील प्रवास सुरू होणार आहे. दरम्यान, याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे कोणतीही माहिती नससल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.पुण्यातील ट्रॅव्हल्स कंपनीच्या माध्यमातून हे पर्यटक कैलास मानस सरोवर यात्रेसाठी गेले आहेत. त्यात पुणे, बारामती, मुंबई, बेळगाव, सांगलीमधील ५८ पर्यटकांचा समावेश आहे. पुण्याच्या रघुकुल हॉलीडेज या ट्रॅव्हल्स कंपनीचे नेपाळ मधील ट्रॅव्हल्स कंपन्यांबरोबर आर्थिक व्यवहारहोते. या कंपनीनेने नेपाळच्या ट्रॅव्हल्स कंपन्यांना ५४ लाख रुपये देणे अपेक्षित होते. पैसे मिळाल्याशिवाय पर्यटकांचा प्रवास होणार नाही,अशी भूमिका संबंधित कंपन्यांनी घेतली. परंतु, तीन दिवस अडकून पडल्याने पर्यटकांनी नेपाळमधील भारतीय दुतावासाशी व केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्याशी संपर्क साधला, असे पर्यटकांच्या नातेवाईकांनी सांगितले.रघुकुल हॉलीडेज कंपनीचे अमित कुलकर्णी म्हणाले, संबंधित पर्यटक नेपाळमधील काठमांडूपासून सुमारे २०० किलोमीटर अंतरावर तैमूर येथे आहेत. तेथून जवळच चीनची सीमा आहे. मात्र, पर्यटकांच्या प्रवासाचा प्रश्न मार्गी लागला असून मंगळवारपासून त्यांचा पुढील प्रवास सुरू होणार आहे. येत्या ४ जुलैपर्यंत विविध ठिकाणी फिरून आल्यानंतर त्यांचा प्रवास संपणार आहे.प्रवाशांनी नातेवाइकांना माहिती देताना सांगितले, रघुकल हॉलीडेजकडून तातडीने पैसे मिळण्याची मागणी काठमांडू येथील द ट्रेकर्स सोसायटी प्रा. लि. या कंपनीने केली होती. त्याशिवाय पर्यटकांना सोडणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती.
मुंबई-पुण्यातील प्रवासी अडकले चीनच्या सीमेवर, ट्रॅव्हल्स कंपनीच्या ढिसाळ व्यवस्थापनाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 2:51 AM