नवी दिल्ली : हिंदाल्कोला तालाबिरा-२ कोळसा खाणपट्टा देण्यासाठी आपण कुणालाही ‘प्रभावित’ केले नाही किंवा असे करण्यासाठी ‘विनाकारण घाई’ देखील करण्यात आलेली नाही, असे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी सीबीआयला सांगितले.आपण ओडिशातील उद्योगपती कुमारमंगलम बिर्ला यांची कंपनी हिंदाल्कोला कोळसा खाणपट्टा देण्याबाबत कोणतेही आश्वासन दिलेले नव्हते. यासंदर्भात आपण बिर्ला आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या पत्राची सावधपणे तपासणी करण्यासाठी ते पत्र केवळ मंत्रालयाकडे पाठविले होते, असेही २००५ मध्ये कोळसा मंत्रालयाचा कार्यभार सांभाळणारे मनमोहनसिंग यांनी या खाणपट्टा वाटप घोटाळ्याचा तपास करणाऱ्या सीबीआयला सांगितले. ‘मला विचारल्यावर मी असे सांगतो की, मी माझ्या पीएसच्या नोटिंगशिवाय अन्य कुणालाही स्मरणपत्र जारी करण्यास सांगितल्याचे मला आठवत नाही. ही एक सामान्य प्रशासकीय बाब आहे. पंतप्रधान कार्यालय अशा प्रकारच्या मुद्यांच्या खोलात जात नाही. मी कुणालाही प्रभावित करण्याचा प्रयत्न केलेला नाही आणि मी निर्णय घेताना कोणत्याही प्रकारची अनावश्यक घाईदेखील केलेली नाही हे मी आधीच सांगितलेले आहे,’ असे मनमोहनसिंग यांनी सीबीआयसमक्ष नोंदविलेल्या आपल्या जबाबात म्हटले आहे.बिर्ला यांनी कोळसा खाणपट्टा वाटपासाठी हिंदाल्कोचा विचार न करण्याचा निर्णय बदलण्यासाठी सरकारला विनंती पत्र लिहिले होते, तर पटनायक यांनी या निर्णयाचा फेरविचार करण्याचे आवाहन केले होते. सर्वोच्च न्यायालयाने १ एप्रिल रोजी या कोळसा घोटाळ्याबाबत मनमोहनसिंग आणि कुमारमंगलम बिर्ला व माजी कोळसा सचिव पी. सी. पारीख यांना आरोपी म्हणून न्यायालयात बोलावण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)
खाणपट्ट्यासाठी प्रभाव टाकला नाही -मनमोहनसिंग
By admin | Published: October 02, 2015 11:42 PM