नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून 26/11च्या मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेत सुरक्षा जवानांच्या शौर्यालाही सलाम केला आहे. दहशतवाद हे जगातील मानवतेसाठी एक आव्हान बनलं आहे. दहशतवादाविरोधात जगातील सर्व मानवतावादी शक्तींनी एकत्र यायला पाहिजे. तसेच मोदींनी संविधान दिवसाच्या निमित्तानं संविधानाचे निर्माते बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणींनाही उजाळा दिला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात हा कार्यक्रम भाजपा अध्यक्ष अमित शाहांनी इतर नेत्यांसोबत ऐकला. 26/11 आपला संविधान दिवस आहे. परंतु हे देश कसं विसरू शकेल, की 9 वर्षांपूर्वी याच दिवशी दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला होता. भारत देश त्या शूरवीर नागरिक, पोलीस, सुरक्षा जवानांना सदैव स्मरणात ठेवेल. ज्यांनी या हल्ल्यात स्वतःचा जीव गमावला आहे, त्याचं बलिदान कधीही विसरता येणार नाही. भारताचं संविधान हा आपल्या लोकशाहीचा आत्मा आहे. आजचा दिवस संविधान सभेच्या सदस्यांना स्मरण करण्याचा दिवस आहे. आपण भारताच्या ज्या संविधानाचा जयजयकार करतो ते संविधान बाबासाहेबांसाख्या कुशल नेतृत्वामुळे प्रत्यक्षात अवतरलं आहे. संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. देशाला समृद्ध आणि शक्तिशाली बनवण्यात बाबासाहेबांचं मोठं योगदान आहे.तसेच 4 डिसेंबर रोजी नौदल दिवस साजरा करणार असल्याचंही पंतप्रधानांनी सांगितलं आहे. जर तुम्हाला शेतातल्या पिकांची चिंता आहे, तर त्या धरणीमातेचीही काळजी घ्यावी लागणार आहे. 3 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन आहे. त्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी 'मन की बात'मधून दिव्यांगांना प्रोत्साहित केलं. दिव्यांग दृढनिश्चयी आणि शक्तिशाली आणि धाडसी आहेत. प्रत्येक क्षणी त्यांच्याकडून काही ना काही शिकायला मिळतं. सध्या प्रत्येक क्षेत्रात ते चांगलं काम करत आहेत, असं मोदी म्हणाले.
मुंबईवरील 26/11चा हल्ला कधीही विसरणार नाही, दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देऊ- मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2017 1:28 PM