गुडगांव : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली १२ मेरोजी गुडगांव येथून मतदान करणार आहे. पत्नी अनुष्का शर्मासोबत त्याला मुंबईतून मतदान करायचे होते़ मात्र पत्ता बदलल्याचा अर्ज उशिरा भरल्याने त्याची ही संधी हुकली. विराट दिल्लीचा रहिवासी होता. नंतर त्याने गुडगांव येथे घर घेतले. अनुष्कासोबत विवाह केल्यानंतर विराटने मुंबईतील वरळी भागात घर घेतले. विवाहनंतर जोडीने मतदान करण्याची पहिलीच वेळ असल्याने विराटला वरळीतून मतदान करायचे होते. पत्ता बदलल्याचा अर्ज भरण्याची शेवटी तारीख ३० मार्च होती. विराटने ७ एप्रिलला अर्ज भरला़ त्यामुळे त्याचा अर्ज मंजूर झाला नाही व त्याला मुंबईतून मतदान करता आले नाही. आता त्याने गुडगांव येथून मतदान करण्याचे ठरवले आहे.
तसे त्याने अधिकृतरीत्या इन्स्टाग्राम अकाउंटवर जाहीर केले आहे. मी १२ मेरोजी गुडगांव येथे मतदान करण्यासाठी तयारी केली आहे, असा मजकूर विराटने इन्स्टाग्रामवर लिहिला आहे़ या मजकुरासोबत त्याने त्याचे निवडणूक ओळखपत्र जोडले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी विराटला अनुष्कासोबत मुंबईतून मतदान करता आले नसले तरी विधानसभा निवडणुकीला तो मतदान करू शकतो. मात्र, त्यासाठी त्याला आगाऊ सर्व प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतील़ महाराष्ट्रात अंदाजे नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे.