मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहर हे देशातले सर्वात महागडे शहर ठरले आहे. न्यूयॉर्कच्या इंटरनॅशनल कन्सल्टिंग फर्म मर्सरच्या, कॉस्ट आॅफ लिव्हिंगने २०१८ मध्ये या संदर्भात केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. यातून ही माहिती पुढे आली आहे. जागतिक पातळीवर करण्यात आलेल्या या सर्वेक्षणामध्ये मुंबईसोबतच दिल्ली, चेन्नई, बंगळुरू, कोलकाता या भारतातील अन्य चार शहरांचाही समावेश आहे. जगाच्या पातळीवर राहण्यासाठी महागड्या असणाऱ्या शहरांमध्ये संपूर्ण जगात हाँगकाँग हे शहर सर्वात महागडे शहर ठरले आहे. देशात पहिल्या क्रमांकावर असलेल्या मुंबईचा जगातील यादीत मात्र, ५५ वा क्रमांक आहे. तर दिल्ली १०३, चेन्नई १४४, बंगळुरूचा १७० तर कोलकाता १८२ व्या स्थानावर आहे. जगातील एकूण २०९ प्रमुख शहरांमध्ये हा सर्व्हे करण्यात आला आहे. प्रत्येक शहरातील २०० वस्तूंच्या दरांची तुलना करून त्याआधारावरच या शहरांची महागडे शहर म्हणून क्रमवारी निश्चित करण्यात आली आहे. या सर्वेक्षणामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या भारतीय शहरांमध्ये महागाईचा दर अनुक्रमे ५.५७ टक्के नोंदवण्यात आला आहे. हा दर देशात सर्वाधिक ज्या शहरांमध्ये दिसून आला त्या शहरांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. २०० वस्तूंमध्ये प्रामुख्याने शेती उत्पादने, दूध उत्पादने, अवजड उत्पादने या उत्पादनांचे त्या त्या शहरातील असणारे दर तपासून पाहण्यात आले. या उत्पादनांच्या दरात विक्रमी वाढ झाल्यावरच शहरातील कॉस्ट आॅफ लिव्हिंगमध्ये वाढ होते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याच अंदाजानुसार मुंबई हे भारतातील सर्वात महागडे शहर ठरले आहे.
मुंबई सर्वात महागडे शहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 4:25 AM