नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसचा वेग पुन्हा वाढताना दिसत आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनावरील लसीवर संशोधन सुरू आहे. यातच महाराष्ट्रातील मुंबईत असणाऱ्या एका ट्युरिझम कंपनीने लोकांसाठी 'वॅक्सीन ट्युरिझम' ऑफर आणली आहे. मात्र, कंपनीच्या या जाहिरातीवरून वाद निर्माण झाल्यानंतर स्पष्टीकरण द्यावे लागले.
एडलव्हाइस म्युच्युअल फंड्सच्या सीईओ राधिका गुप्ता यांनी सोमवारी व्हायरल झालेल्या व्हाट्सएप मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर केला. हा मेसेज एखाद्या पर्यटन कंपनीचा असल्याचे दिसून आले. अमेरिकेत डिसेंबरमध्ये आकर्षक पॅकेजेची ऑफर करीत असल्याचा मेसेज आहे.
कंपनीच्या या ऑफरमध्ये तुम्हाला मुंबईहून न्यूयॉर्कला जाण्यासाठी तीन दिवस आणि चार-रात्रीचे पॅकेज 1,74,999 रुपयांत मिळेल, ज्यामध्ये एअरफेअर आणि हॉटेलमध्ये राहण्याची सोय आहे. यासोबत या ऑफरमध्ये ब्रेकफास्ट आणि एक लसीचा डोस देखील मिळणार असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, या जाहिरातीवरुन वाद निर्माण झाल्यानंतर ही फक्त नोंदणी आहे, असे कंपनीने म्हटले आहे. दुसरीकडे, कोरोना व्हायरसची लस भारतात जानेवारीमध्ये येण्याची शक्यता आहे. ही लस आरोग्य सेवक, डॉक्टर, पोलीस आदी कोरोना योद्ध्यांना आधी दिली जाणार आहे. त्यानंतर वयानुसार टप्प्याटप्प्याने ही लस दिली जाणार आहे.
याचबरोबर, जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार सध्या भारतासह जगभरात २१२ ठिकाणी लस तयार करण्यात येत आहे. या २१२ लसींपैकी १६४ लसी ह्या प्री क्लिनिकल स्टेजमध्ये आहेत. दिलासादायक बाब म्हणजे ११ लसी ह्या चाचणीच्या शेवटच्या टप्प्यात आहेत.
यामध्ये फायर-बायोएनटेक आणि अमेरिकेतील फार्मास्युटिकल कंपन्यांनी आपल्या कोविड-१९ व्हॅक्सिनच्या ह्युमन ट्रायलचे निष्कर्ष जारी केले आहे. मॉडर्ना व्हॅक्सिन ९४.५ टक्के आणि फायझर-बायोएनटेक ९५ टक्के प्रभावी दिसून आली आहे. आता दोन्ही कंपन्या मान्यतेसाठी अर्ज करणार आहेत. त्यानंतर या वर्षअखेरीस यांच्या प्रॉडक्शनची सुरुवात होणार आहे.