लखनौ - अनेकाचं आयुष्य हे संघर्षांनी भरलेलं असतं. म्हणूनच संघर्षावर मात करत यशाचं शिखर गाठल्यानंतर या संघर्षवान व्यक्तींचं भरभरुन कौतूक होत असतं. क्रीडा विश्वात महेंद्रसिंह धोनी हे त्याचचं उदाहरण आहे. धोनीने अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत देशाचं नाव जगात आणि धोनीचंही नाव जगभरात झळकावलं. आता, भारतीय महिला ज्युनियर हॉकी संघातही अशाच संघर्षशाली खेळाडूचा प्रवेश झाला आहे. रस्त्यावर भाजी विकणाऱ्या आईच्या मुलीने क्रीडा विश्वात अशी बाजी मारली आहे. मुमताज खान असं भारतीय संघात निवड झालेल्या खेळाडूचं नाव आहे.
युपीची राजधानी लखनौची कन्या आणि हॉकी खेळाडू मुमताज खान हिची ज्युनियर भारतीय हॉकी संघात निवड झाली आहे. विशेष म्हणजे हॉकी विश्वचषक स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या संघात ती देशाचं प्रतिनिधीत्व करणार आहे. 1 ते 12 एप्रिलपर्यंत होत असलेल्या या विश्वचषक स्पर्धेत मुमताज ही उत्तर प्रदेशातून खेळणारी एकमात्र खेळाडू आहे. त्यामुळे, मुमताच्या कुटुंबीयांसह मित्रपरिवार आणि नातेवाईकांनाही मुमताजच्या या भरारीचा अभिमान आणि आनंद वाटत आहे.
मुमताजे वडिल हाफीज खान हे लखनौ कॅट परिसरातील रहिवाशी असून जवळच ते भाजी विक्रीचा गाडा चालवतात. आपण भाजी विकत असलो तरी मुलीच्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी त्यांनी कधी माघार घेतली नाही. मुलीला खेळाडू बनविण्यासाठीचा त्यांचा प्रयत्न कौतुकास्पद असून ते तिला शक्य ती साधनसामुग्री उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करतात. के.डी.सिंह बाबू स्टेडियममध्ये हॉकी कोच निलम सिद्दिकी यांच्याकडून मुमताजने हॉकीचे धडे गिरवले.
12 जणांच्या मोठ्या कुटुंबात जन्मलेली मुमताज कुटुंबात वेगळीच आहे. ज्युनियर नॅशनल हॉकी टुर्नामेंटमध्ये तिने दमदार कामगिरी केली होती. त्यामुळेच, 2016 साली ज्युनियर इंडिया कँपसाठी तिची निवड करण्यात आली. तेथून तिच्या हॉकी करिअरला उंची मिळत गेली. मुमताने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आत्तापर्यंत 40 सामने खेळले आहेत. भारतीय महिला हॉकी संघात खेळण्याचे मुमताचे स्वप्न आहे.
दरम्यान, ज्युनियर महिला हॉकी संघाने शुक्रवारी दक्षिण कोरियाचा 3-0 ने पराभव केला आहे. या विजयानंतर भारताने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. एकंदरीत यंदाच्या स्पर्धेत भारतीय संघाचं प्रदर्शन कौतूकास्पद असून मुमतानेही लक्षवेधी कामगिरी केली आहे.