आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपांच्या फैऱ्या सुरू आहेत. गुजरातमध्ये सत्ताधारी भाजपाची मोठी ताकद आहे. राज्यात भाजपाला रोखण्यासाठी भरूच लोकसभा मतदारसंघातून आम आदमी पक्षाशी आघाडी करून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या काँग्रेस नेत्या मुमताज पटेल यांनी मोठा खुलासा केला आहे. त्या काँग्रेसचे दिग्गज नेते अहमद पटेल यांच्या कन्या आहेत. भरूचच्या जागेवर तिकिटासाठी उमेदवार असलेल्या मुमताज यांनी म्हटले की, केवळ मुस्लिम असल्यामुळे त्यांना दिल्लीत भाड्याने घर मिळत नाही.
मुमताज पटेल यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. भारतात मुसलमान सुरक्षित आहेत का? या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, खूप गंभीर परिस्थिती आहे. मी एक मुस्लीम म्हणून हे सांगत आहे. आजच्या घडीला मी जर दिल्लीत भाड्यानं घर घ्यायचं ठरवलं तर कोणी देणार नाही. मी रोज घराच्या शोधात आहे, पण मिळत नाही.
मुमताज पटेल यांचा खुलासा तसेच दोन वर्षांपूर्वी माझी आई देखील घर शोधत होती. पण मिळाले नाही. एक म्हणजे राजकीय घराणं आणि त्यात मुस्लीम... त्यामुळं नाना अडचणींचा सामना करावा लागतो. जर अहमद पटेल यांच्या कुटुंबासोबत असं होत असेल तर विचार करा सामान्य मुसलमानांवर किती दबाव असेल. गुजरातमध्ये देखील परिस्थिती ठीक नाही. इथं वाद झाल्यास मुसलमानांची तक्रार देखील घेतली जात नाही. एखादा मुस्लीम नागरिक आमच्या रॅलीत सहभागी झाला तर त्याला त्रास दिला जातो, असा आरोप मुमताज यांनी केला. मुमताज पटेल यांनी राम मंदिरावरही भाष्य केलं. त्या म्हणाल्या की, हा एक भावनिक मुद्दा आहे. याचं कधीही राजकारण करू नये.