UP Election Results 2022 : उत्तर प्रदेशात निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी सुरूवात करण्यात आली. सुरूवातीला समोर आलेल्या कलांवरून उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) पुन्हा एकदा भाजप सरकार सत्तेत येईल असं चित्र निर्माण झालं आहे. दरम्यान, शायर मुनव्वर राणा (Munawwar Rana) यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. लखनौमधील मुनव्वर राणा यांच्या कॉलनीचं गेटच बंद करण्यात आलं आहे. तसंच यासोबत त्यांच्या घराच्या जवळपास पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय. योगी आदित्यनाथ जर पुन्हा मुख्यमंत्री बनले तर आपण उत्तर प्रदेश सोडू असं वक्तव्या मुनव्वर राणा यांनी यापूर्वी केलं होतं.
"जर योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री झाले तर मी उत्तर प्रदेश सोडून देईल. दिल्ली किंवा कोलकात्यात निघून जाईल. माझ्या वडिलांनी पाकिस्तानात न जाण्याचा निर्णय घेतला होता. आता मला जड अंत:करणाने हे शहर, हा प्रदेश आपली भूमी सोडून जावं लागेल," असं मुनव्वर राणा यांनी यापूर्वी म्हटलं होतं.
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांच्या खांद्यावर हात ठेवत चुकीच केलं. यामुळे त्यांनी उत्तर प्रदेशात भेदभाव पसरवला. या सरकारनं सबका साथ सबका विकासच्या घोषणा दिल्या होत्या. परंतु काही झालं नाही. यांचं चाललं तर ते मुस्लिमांनाही येथून बाहेर काढतील. त्यांच्यासाठी दिल्ली, कोलकाना, गुजरात अधिक सुरक्षित आहे," असंही त्यांनी म्हटलं होतं.